Vidhansabha 2019 : शिवसेनेचे 'वेट ऍण्ड वॉच'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

"आमचं ठरलं आहे' असे वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांच्या "मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार आहे' या वक्तव्याने अडचण केली आहे. त्यातच मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या बैठकीत 288 जागांची तयारी करण्याचे आदेश मिळाल्याने शिवसेना- भाजपच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र यावर कोणतेही वक्तव्य न करता "वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका सध्या शिवसेनेने घेतली आहे.

मुंबई - "आमचं ठरलं आहे' असे वारंवार सांगणाऱ्या शिवसेनेची मुख्यमंत्र्यांच्या "मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार आहे' या वक्तव्याने अडचण केली आहे. त्यातच मुंबईत सुरू असलेल्या भाजपच्या बैठकीत 288 जागांची तयारी करण्याचे आदेश मिळाल्याने शिवसेना- भाजपच्या युतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र यावर कोणतेही वक्तव्य न करता "वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका सध्या शिवसेनेने घेतली आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना शिवसेना- भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावे- प्रतिदावे करण्यात येत आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी शिवसेना- भाजपने मुख्यमंत्रिपद अडीच- अडीच वर्षे वाटून घेतले असल्याचे वक्तव्य केले होते, तर भाजपच्या गोरेगावमध्ये पार पडलेल्या कार्यसमिती बैठकीत "मी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार' असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने भाजपचा मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपकडून मुख्यमंत्री कुणी व्हावे हा त्यांचा प्रश्न असून, त्याबद्दल आम्ही काही वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे युतीबाबत सर्वकाही ठरले असून, उद्धव ठाकरे हे योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 'शिवसेना सध्या "वेट ऍण्ड वॉच'च्या भूमिकेत असून कार्यकर्त्यांनी कुणाच्याही वक्तव्याकडे लक्ष न देता आपले काम करत राहावे, उद्धव ठाकरे योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करतील,'' असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Shivsena Wait and Watch Politics