Vidhansabha 2019 : एकला चलोची तयारी

संदीप भारंबे
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

कार्यकर्ता प्रशिक्षण जोरात 
वंचित बहुजन आघाडीतर्फे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. यात प्रामुख्याने समाज माध्यमांसह आपल्या भागात प्रभाव कसा निर्माण करायचा, नेटवर्क कसे वाढवायचे, याचे प्रशिक्षण ठिकठिकाणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच महिला आघाडीने अधिकाधिक बैठकांचा धडाका सुरू ठेवला आहे.

काँग्रेस आघाडीशी ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखती, कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणावर भर दिला आहे. उमेदवारीही लवकर जाहीर होईल. त्यामुळे काँग्रेस आघाडी आणि वंचित कितपत आघाडी करतील, ही शंकाच आहे.

लोकसभा निवडणुकीत अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठीही जोरदार तयारी चालवली आहे. पक्षाकडून राज्यभरातील विधानसभा मतदारसंघांचा सामाजिक-राजकीय परिस्थितीनुसार अभ्यास पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. काँग्रेसने आघाडीबाबत ठोस पुढाकार न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीकडून येत्या १० रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्‍यता पक्षातील सूत्रांनी वर्तवली आहे. 

माफीनंतरच बोलणी
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना फटका बसला. काहींचा दारुण पराभव झाला. त्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीसोबत घेण्याबाबत काँग्रेसचे प्रदेश स्तरावरील नेते आग्रही आहेत. काँग्रेसच्या आघाडीच्या प्रस्तावाबाबत लवकरच प्रकाश आंबेडकर काँग्रेसला पत्र लिहिणार आहेत. काँग्रेसने आधी ‘वंचित’ ही भाजपची ‘बी टीम’ आहे, असा आरोप केला होता. या आरोपाबद्दल माफी मागितल्याशिवाय आघाडीबाबत बोलणीच करणार नाही, असे कळवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. असे असले तरी अशा प्रकारे आघाडीची शक्यता कमी आहे.

सध्या वंचित बहुजन आघाडीचा धसका काँग्रेस-‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी घेतला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे काही आजी-माजी आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. भाजपमधील इनकमिंगसोबतच ‘वंचित’कडेही आघाडीतील काही नेते जाण्याची शक्‍यता आहे. 

फुटीचा परिणाम अपेक्षित नाही 
वंचित बहुजन आघाडीतून लक्ष्मण माने बाहेर पडले असले तरी, विदर्भ-मराठवाड्यात त्याचा फारसा परिणाम होणार नाही. पश्‍चिम महाराष्ट्रातही वंचित आघाडी नव्या व्यूहरचनेसह उतरली आहे. सध्या भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या नेतृत्वात वंचित 
आघाडीची समिती पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. तिथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 vanchit Bahujan Aghadi Candidate Interview Politics