Vidhansabha 2019 : युतीचे घोडे 'मित्रपक्षा'वरून अडले

मृणालिनी नानिवडेकर
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपदरम्यान सुरू असलेल्या चर्चेच्या सात फेऱ्यांत कोणताही समाधानकारक फॉर्म्युला निघाला नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट हाच जागावाटपाचा मार्ग असेल, असे उच्च पदस्थांनी सांगितले. दोघांची भेट एक-दोन दिवसांत व्हावी, यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे.

समसमान जागावाटपाचे सूत्र भाजपला अमान्य
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपदरम्यान सुरू असलेल्या चर्चेच्या सात फेऱ्यांत कोणताही समाधानकारक फॉर्म्युला निघाला नसून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट हाच जागावाटपाचा मार्ग असेल, असे उच्च पदस्थांनी सांगितले. दोघांची भेट एक-दोन दिवसांत व्हावी, यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. परंतु, मित्रपक्षांच्या 18 जागा दोन्ही पक्षांनी समसमान वाटप करण्याचे सूत्र भाजपला अद्याप मान्य नसल्याने चर्चेचे घोडे अडल्याचे समजते.

जागावाटपाबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात चर्चा झाली. मात्र, त्यातून कोंडी सुटली नसल्याचे समजते. मित्रपक्षांच्या 18 जागा भाजप-शिवसेनेने समसमान वाटाव्यात, या प्रस्तावालाही उत्तर न मिळाल्याने बोलणी बंद आहेत. लोकसभा निवडणुकीआधी ठरलेले समसमान जागावाटपाचे सूत्र मान्य करणे शक्‍य नसल्याचे भाजपच्या नेत्याने सांगितले. शिवसेनेने 117 जागा लढवाव्यात, अशी बहुतांश नेत्यांची इच्छा आहे. शिवसेनेने किती जागा लढवाव्यात, यावर मौन बाळगले असले; तरीही 135 जागांपेक्षा कमी आकडा कसा स्वीकारणार, हादेखील प्रश्‍न आहे. ही कोंडी केवळ दोन नेते फोडू शकतात, असे दोन्हीकडील मध्यस्थांकडून सांगितले जात आहे. शिवसेनेला वास्तवाची जाणीव असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी एक-दोन दिवसांत युतीची घोषणा होईल, असे सांगून टाकले.

यादरम्यान फडणवीस यांनी "मातोश्री'ला भेट देऊन हा तिढा अनंत चतुर्दशीच्या आत सोडून टाकावा, असा निरोप शिवसेनेशी संबंधित एका मध्यस्थाने पाठविला. तसेच, भाजपला 150 ते 160 जागा लढायच्या असतील, तर त्यांना सत्तेत आम्ही नकोत, असे वाटते, अशी भावना शिवसेनेच्या एका नेत्याने व्यक्‍त केली. आज दिवसभर जागा अदलाबदलीच्या चर्चा सुरू होत्या. पण, त्या माध्यमातल्या आहेत, अशी टिप्पणी नेत्यांनी केली. युती होणार, अशी उभयपक्षी खात्री असली, तरी ती किती जागांवर, याचे कोडे अधिकच गडद झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा शब्द राखत समसमान वाटप होईल, असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. भाजपने मात्र यावर काहीही भाष्य करणे टाळले असल्याने नोकझोक चर्चेचा विषय ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhansabha Election 2019 Yuti BJP Shivsena Politics Other Party