विधिमंडळाच्या 51 वर्षांत 285 आमदार निलंबित

- प्रशांत बारसिंग
शनिवार, 11 मार्च 2017

गैरवर्तणुकीच्या कारणांमुळे 29 घटना; सीमा प्रश्‍नासंबंधी जास्त घटना

गैरवर्तणुकीच्या कारणांमुळे 29 घटना; सीमा प्रश्‍नासंबंधी जास्त घटना
मुंबई - राज्याच्या विधिमंडळाच्या इतिहासात सभागृहात केलेल्या गैरवर्तणुकीच्या कारणांमुळे आतापर्यंत आमदार निलंबनाच्या 29 घटना घडल्या असून, त्यात 285 आमदार निलंबित झाले आहेत. यामध्ये सीमा प्रश्‍नासंबंधी निलंबित होणाऱ्या आमदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 106 इतकी आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. 9) घडलेल्या प्रशांत परिचारक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार आमदारांचे निलंबन वगळता अन्य घटनांत विधायक कारणांसाठी आमदारांचे निलंबन झाल्याचे विधानमंडळातील उपलब्ध नोंदीवरून दिसून येते.

पहिली घटना 13 ऑगस्ट 1964 रोजी
राज्याचे विधानमंडळ अस्तित्वात आल्यानंतर निलंबनाची पहिली घटना 13 ऑगस्ट 1964 रोजी घडली. आपला ध्वनिक्षेपक बंद असल्याच्या कारणाने फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुतराव धोटे यांनी माइक तोडण्याबरोबर सभागृहात पेपरवेट फेकल्याने त्यांचे सभासदत्व कायमचे रद्द करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍नाच्या मुद्‌द्‌यावर संयुक्‍त महाराष्ट्र समिती व संयुक्‍त सोशालिस्ट पार्टीच्या 20 सदस्यांना 31 ऑगस्ट 1966 रोजी सहा दिवसांसाठी निलंबित केले होते. याच प्रश्‍नावर महाजन आयोगाचा अहवाल जाळून टाकण्याची मागणी करत मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संयुक्‍त महाराष्ट्र समितीच्या 43 सदस्यांना सुरवातीला संपूर्ण कालावधीसाठी व नंतर एक दिवसासाठी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले होते. त्यानंतरही याच प्रश्‍नावर 8 नोव्हेंबर 1967 रोजी 43 सदस्यांना दहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते.

दुष्काळ, महागाईवरूनही कारवाई
राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्ष आणि जनसंघाच्या 27 आमदारांना 22 मार्च 1973 रोजी पाच दिवस, शेकाप व कॉंग्रेसच्या 13 सदस्यांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित केले होते. महागाई आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या टंचाईसंदर्भात शेकाप व इतर पक्षांच्या 17 आमदारांना 6 ऑगस्ट 1974 आणि 5 सदस्यांना 7 ऑगस्ट 1974 रोजी सहा दिवसांसाठी निलंबित केले होते.

भुजबळही सभागृहाबाहेर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरून सभागृहात निर्माण झालेल्या अभूतपर्व परिस्थितीमुळे शिवसेनेच्या 13 आमदारांना 25 आणि 27 जुलै 2000 रोजी सहा महिने ते एक वर्षाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. छगन भुजबळ शिवसेनेत असताना सभागृहात कापडी फलक फडकावल्याप्रकरणी त्यांना दोन दिवसांसाठी 26 नोव्हेंबर 1987 रोजी निलंबित करण्यात आले होते. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी मराठीत शपथ घेण्यास नकार दिल्याने त्यांना मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या चार आमदारांना चार वर्षांसाठी निलंबित केले होते; मात्र त्यानंतर हे निलंबन मागे घेण्यात आले. काल 9 मार्च 2017 रोजी विधान परिषदेतील आमदार प्रशांत परिचारक यांना सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

अर्धशतकी इतिहास...
- आजपर्यंत निलंबनाच्या घटना - 29
- एकूण निलंबित आमदार - 285
- सीमाप्रश्‍नी निलंबन - 106 आमदार
- शेतकरी व दुष्काळ प्रकरण - 50
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ - 11
- अबू आझमी यांना मारहाण - मनसेचे 4 आमदार
- सैनिकांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह विधान - प्रशांत परिचारक

Web Title: vidhimandal 285 mla suspend in 51 years