
दहावी-बारावी परीक्षांवर ‘दक्षता पथका’चा वॉच! ‘रनर’ करणार व्हिडिओ रेकॉर्डिंग; पेपरपूर्वी मुलांचे समुपदेशन
सोलापूर : इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा माध्यमिक बोर्डाने ठोस पाऊल उचलत दक्षता समितीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा काळात वाढीव भरारी पथके नेमली जाणार असून त्यात पोलिस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक केंद्रावर दररोज ते पथक जाईल, हा त्यामागील हेतू आहे. दरम्यान दहावी- बारावी परीक्षांवर ‘दक्षता पथका’चा वॉच राहणार असून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.
परीक्षेदरम्यान ‘रनर’कडे व्हिडिओ रेकॉर्डिंची जबाबदारी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरात नऊ हजार केंद्रे असून त्याअंतर्गत जवळपास ३२ लाख विद्यार्थी परीक्षा देतील. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी पुणे बोर्डाने यंदा लोकांकडून सूचना तथा अभिप्राय मागविले होते. जवळपास पावणेतीनशे लोकांनी बोर्डाकडे सूचना पाठवल्या.
त्यानुसार आता बोर्डाने दोन प्रस्ताव तयार केले असून शासनाकडे मान्यतेसाठी पाठवले आहेत. दोन दिवसांत त्यावर निर्णय अपेक्षित आहे. परीक्षांवर वॉच ठेवण्यासाठी दरवर्षी बैठे पथक, भरारी पथके नेमली जात होती. मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकाची मदत भरारी पथकांसाठी घेतली जाणार आहे.
दुसरीकडे परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोच करून उत्तरपत्रिका घेऊन जाणाऱ्या ‘रनर’ची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रांवरील हालचालींचे व्हिडिओ शुटिंग केले जाणार आहे. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. त्यात पोलिस, महसूल, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. परीक्षेला एका वर्गात २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असणार आहे.
‘प्रात्यक्षिक’चे साहित्य जपून ठेवा
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे भूगोल विषयांचे प्रात्यक्षिक घेताना सर्वे करावा लागतो. तो गुगल मॅपवर नोंदवला जात असल्याने त्याचे रेकॉर्ड बोर्डाकडे जाणार आहे. पण, दहावी-बारावीच्या इतर विषयांचे प्रात्यक्षिक साहित्य बोर्डाला पाठवायची गरज नाही. शाळा-महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेतलेले साहित्य जपून ठेवावे. त्याची कधीही गरजेनुसार पडताळणी होऊ शकते, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बारावीचे प्रात्यक्षिक १ ते २० फेब्रुवारीपर्यंत संपेल. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरु होणार असून १ मार्चपर्यंत प्रात्यक्षिक उरकले जाणार आहे. त्यानंतर लगेचच लेखी परीक्षा सुरु होईल.
परीक्षार्थींना शिक्षेची आठवण करून दिली जाणार
परीक्षा हॉलमध्ये गेलेल्या प्रत्येक परीक्षार्थीना पहिल्यांदा पर्यवेक्षक कॉपी करताना सापडल्यास काय शिक्षा होऊ शकते, याची माहिती देणार आहेत. त्यानंतर त्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिल्या जातील. भरारी पथक आता प्रत्येक परीक्षा केंद्रावर भेटी देईल, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यांना कॉपी करताना कोणी आढळल्यास, त्या विद्यार्थ्यावर जागेवरच कारवाई केली जाणार आहे.