विरोधी पक्षनेतेपदी वडेट्टीवार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 जून 2019

नीलम गोऱ्हे उपसभापतिपदी बिनविरोध
विधान परिषदेत उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे अनिल परब यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला भाजपचे भाई गिरकर यांनी अनुमोदन दिले, तर काँग्रेस आघाडीकडून मांडण्यात आलेला जोगेंद्र कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मागे घेतला, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना धसास लावण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी राजकारणातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्‍त्या म्हणून त्यांनी वेळोवेळी पक्षाची बाजू मांडली. विधान परिषदेत त्या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली. 

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने केवळ एक जागा जिंकली असून ती जागा चंद्रपूरची आहे. चंद्रपूरचे असलेल्या वड्डेटीवार यांनी या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. स्वभावाने आक्रमक असलेले वड्डेटीवार हे विधानसभेतही विविध मुद्द्यांवर आक्रमक असतात.

त्यामुळे काँग्रेसने विखे यांच्यानंतर वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करावी, असे पत्र हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिले होते. अधिवेशन सुरू होऊन एक आठवडा उलटल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदावर निवड जाहीर करण्यात आली आहे. आता कामकाजाचे केवळ सात दिवस शिल्लक असून, हे या सरकारमधील शेवटचे अधिवेशन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडीबद्दल वड्डेटीवार यांचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay wadettiwar Opposition Party leader Politics