गावातील विकासखर्चाची माहिती कळणार आता एका क्लिकवर!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 जुलै 2019

वर्षनिहाय माहिती
ही माहिती वर्षनिहाय देण्यात आली आहे. सुरुवातीला वर्ष, राज्य निवडावे, त्यानंतर जिल्हा आणि स्वतःचे गाव निवडले की ही विकास कामांवर किती निधी खर्च झाला याची माहिती काही क्षणात नजरेपुढे येते. या निधीचा स्त्रोत काय आहे, केंद्र अथवा राज्य सरकारकडून मिळाला की ग्राम पंचायतीने स्वतःच्या तिजोरीतून खर्च केला याची ही माहिती देण्यात आली आहे. संबंधित कामाचे स्वरुप काय होते, त्याला ग्रामसभेची शिफारस आहे काय तसेच ग्राम पंचायतीने मान्यता दिलेली आहे काय याचीही माहिती इथे उपलब्ध आहे.

मुंबई - गावाच्या ग्राम पंचायतीला विकास कामांसाठी वर्षभरात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून किती निधी मिळाला आणि तो गाव विकासाच्या कोणत्या कामांवर किती खर्च झाला याची सविस्तर माहिती आता एका क्‍लिकवर उपलब्ध आहे.

केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाने यासंदर्भातील संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकतेस्थळावर देशातील कोणत्याही राज्यातील कोणत्याही गावाला मिळालेल्या निधीची आणि खर्चाची इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतींचा कारभार अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

सध्या ग्राम पंचायतींना गावच्या विकासकामांसाठी केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहे. तसेच राज्य सरकारच्या विविध विकास योजनांमधूनही भरपूर निधी उपलब्ध होत आहे. या निधीचा वापर गावच्या योग्य आणि मूलभूत विकास कामांसाठी होतो की नाही हा मुद्दा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा असतो. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पंचायत राज विभागाने एक संकेतस्थळ विकसित केले आहे.

http://www.planningonline.gov.in या संकेतस्थळावर देशातील प्रत्येक राज्य, राज्यांमधील जिल्हे आणि गावे यांची वर्षभरातील वित्तीय माहिती देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Development Expenditure Information on one click