पीकविम्यासाठी चक्क गाव विकायला काढलंय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

सेनगाव तालुक्‍यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी पीकविमा आणि सरसकट कर्जमाफीसाठी चक्क गावच विक्रीला काढले आहे. याबाबत गुरुवारी (ता. १८) तहसील कार्यालयाकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.

सेनगाव (जि. हिंगोली) - सेनगाव तालुक्‍यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी पीकविमा आणि सरसकट कर्जमाफीसाठी चक्क गावच विक्रीला काढले आहे. याबाबत गुरुवारी (ता. १८) तहसील कार्यालयाकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. 

सेनगाव तालुक्‍यातील ताकतोडा येथील लोकसंख्या जवळपास चार हजार असून, एक हजार शेतकरी आहेत. सध्या ताकतोडा येथे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मागील वर्षीचा पीकविमाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी बुधवारी (ता. १७) सायंकाळी गाव सभा घेतली, या वेळी शेकडो गावकरी उपस्थित होते. 

मागील वर्षीच्या दुष्काळामुळे शेतीतून उत्पन्न मिळालेले नाही. सेनगाव तालुक्‍यातील आजेगाव मंडळामध्ये केवळ पस्तीस शेतकऱ्यांनाच पीकविमा देण्यात आला आहे, त्यामुळे इतर शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. आजेगाव मंडळातील सर्वच गावांमध्ये पीकविमा तातडीने द्यावा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, गाव विक्री झाल्यानंतर गावकरी व शेतकऱ्यांना रोजगार देण्याची हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये व्यवस्था करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी गावकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे निवेदन सादर केले असून संपूर्ण गाव विक्रीसाठी काढल्याची माहिती निवेदनाद्वारे दिली. त्यानंतर शुक्रवारपासून (ता. १९) शाळा व ग्रामपंचायत बंद ठेवणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Selling for Crop Loan Farmer