गाव ठरवील ते उमेदवार, 'आखाड पार्टी'त ठराव

विठ्ठल लांडगे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नगर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय पक्षाला दुय्यम स्थान असेल; मात्र सावेडीतून किमान 10 नगरसेवक महापालिकेत दिसावेत, यासाठी 'गाव ठरवील ते उमेदवार' देण्याचा ठराव काल (शुक्रवारी) सावेडीतील ज्येष्ठांनी 'आखाड पार्टीत' मांडला. त्यास इच्छुकांसह सर्वांनीच होकार दिला. त्यातून भविष्यातील राजकारणात सावेडीचा एक दबावगट असेल, यावर सर्वांचे एकमत झाले. त्यामुळे या ठरावाचे निवडणुकीपर्यंत काय होते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना व आरक्षणाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सात ऑगस्टला पाठविण्यात आला. येत्या 27 तारखेला तो जाहीर होईल. अर्थात, निवडणुकीची गणिते त्या वेळी ठरणार असली, तरी सावेडीकरांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या खर्चाने काल 'आखाड पार्टी' रंगली. नगर-मनमाड रस्त्यावरील एका मोठ्या हॉटेलात गावकऱ्यांच्या जेवणावळी उठल्या. संपूर्ण गाव त्यात सहभागी झाले. 

सावेडी भागात वाकळे व बारस्कर यांचे प्राबल्य राहिले आहे. त्यामुळे वाकळे किंवा बारस्कर परिवार घेईल, तो निर्णय निकाल फिरवतो, असा आजवरचा अनुभव. सर्वच पक्षांमध्ये वाकळे व बारस्करांचे वर्चस्व आहे. कॉंग्रेस वगळता सर्वच पक्षांचे नेतृत्व सावेडीत बारस्कर किंवा वाकळे करतात. त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून सावेडीच्या विकासासाठी, तसेच एकूणच दोन्ही परिवारांचा दबावगट भविष्यात निर्माण करण्यासाठी संपूर्ण गावच एक झाले. महापालिकेतील सध्याच्या संख्याबळात बारस्कर व वाकळे परिवारातीलच पाच नगरसेवक आहेत. बैठकीत सर्वांनी मते व्यक्त केली; पण उमेदवार ठरविण्याचे अधिकार ज्येष्ठांना दिल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. गावाचा ठराव डावलून निवडणुकीत नशीब अजमाविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ठरवून पराभूत करण्याची व्यूहरचनाही बैठकीत निश्‍चित करण्यात आली. त्यामुळे इच्छुकांनी गावातील सर्वांशी काल रात्रीपासूनच संपर्क मोहीम सुरू केली आहे. 

महापालिका निवडणुकीत सावेडीचा दबावगट निर्माण करण्यावर सगळ्यांचे एकमत झाले. त्यातही गाव देईल, तो उमेदवार सर्वांनाच मान्य असेल, असाही ठराव कालच्या बैठकीत झाला. त्यात आगामी नगरसेवक किती असतील, यावर सर्वांनीच भूमिका मांडली. सावेडीच्या सर्वांगीण विकासासाठी मांडलेल्या या भूमिकेचे सर्वांनीच स्वागत केले. 
- बाबासाहेब वाकळे, भाजप नेते व सभापती 

सध्याचे संख्याबळ : 5 
बाबासाहेब वाकळे : भाजप 
मनीषा बारस्कर : भाजप 
संपत बारस्कर : राष्ट्रवादी 
कुमार वाकळे : राष्ट्रवादी 
दीपाली बारस्कर : शिवसेना 
 
Web Title: The village will decide which candidate