अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला अन् गावकऱ्यांची सुटका...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

काही नेते शब्दाला पक्के किती असतात याचा आज बुलढाण्यातील देवखड गावातल्या गावकऱ्यांना अनुभव आला.

मुंबई : काही नेते शब्दाला पक्के किती असतात याचाच आज बुलढाण्यातील देवखड गावातल्या गावकऱ्यांना प्रत्यय आला.

प्रचारसभे दरम्यान अजितदादा पवार यांनी काहीही अडचण आली तर मला थेट फोन करा आणि माझा फोन लागला नाही तर माझ्या पीएला फोन करा असे सांगत स्वतःचा व आपल्या पीएचा नंबर मोबाईल नंबर बुलढाण्यातील एका सभेत सांगितला होता.

अतिवृष्टीमुळे बुलढाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड गाव आज चारही बाजूंनी पाण्याने वेढले होते. आता मदतीसाठी कुणाला फोन करायचा म्हणून देवखेडमधील बाजीराव उत्तमराव ढाकणे यांनी अजितदादांच्या पीए सुनीलकुमार मुसळे यांना फोन लावून मदत करण्याची विनंती केली.

मुसळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच बुलढाणा पोलिस कंट्रोल रुमला सदरची माहिती कळवली. पोलिसांनीही तात्काळ दखल घेत पाण्याने वेढलेल्या देवखेड गावातून जवळपास ६० गावकऱ्यांची सुटका करुन त्यांना सुरक्षित स्थळी हलवले.

दरम्यान, सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर आम्ही सुरक्षित स्थळी पोहचलो, आमची सुटका झाली म्हणून आभार मानण्यासाठी देवखेडच्या ग्रामस्थांचा पुन्हा अजितदादांचे पीए सुनीलकुमार मुसळे यांना फोन आला. अजित पवार यांची  प्रशासनावर मजबूत पकड असल्याचे महाराष्ट्रात नेहमीच बाेलले जाते. याचाच प्रत्यय काल आला. यातून अजित पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड असल्याचेच दिसून येते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers rescued by Ajit Pawar's phone