हा तर थेट मराठी माणसाचा अपमानच...

विनायक लिमये
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

मराठी माणसाची दानतच नाही अशी टीका करणाऱ्या श्रीपाद जोशी यांनी आपण ज्या महामंडळाचे प्रतिनिधित्व करतो ते महामंडळ लोकांशी किती जोडले आहे याचा एकदा विचार करावा. लोकांच्याकडून देणगी मिळण्यासाठी या महामंडळाची पुण्याई किती आहे त्याचाही अंदाज घ्यावा... 

मराठी माणसाची दानतच नाही अशी टीका करणाऱ्या श्रीपाद जोशी यांनी आपण ज्या महामंडळाचे प्रतिनिधित्व करतो ते महामंडळ लोकांशी किती जोडले आहे याचा एकदा विचार करावा. लोकांच्याकडून देणगी मिळण्यासाठी या महामंडळाची पुण्याई किती आहे त्याचाही अंदाज घ्यावा... 

"मराठी माणसाची दान करण्याची दानतच नाही' असे संतापाचे उद्‌गार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांनी काढले. खरंतर जोशीबुवांचे हे उद्‌गार ऐकून मराठी माणसाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. ज्या मराठी माणसाला दानत नाही असे जोशीबुवा हिणवत आहेत त्याच मराठी माणसाकडून महामंडळाला सव्वा लाखाचा निधी मिळाला आहे. राज्यात 12 कोटी मराठी माणसे आहेत आणि त्यांच्याकडून आलेली ही देणगीची रक्कम अगदी अल्प आहे असा त्यांचा हा युक्तिवाद आहे. 

खरंतर जोशी हे साहित्यिक म्हणून आणि साहित्य चळवळीतले खंदे कार्यकर्ते म्हणून उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेत. त्यांच्या संयमी आणि अभ्यासू भूमिकेला छेद देणारे असे हे त्यांचे वक्तव्य आहे. जोशी ज्या 12 कोटी मराठी माणसांची आकडेवारी देतात आणि जमलेला सव्वा लाखाचा निधी कमी असल्याची तक्रार करून त्राग्याने मराठी माणसाला दूषणे देतात त्यावेळी ते हे विसरतात की ते ज्या मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्या महामंडळाने किती कोटी लोकांना या महामंडळाशी जोडून घेतले आहे. हे महामंडळ काय करते याची सामान्य लोकांना काडीचीही कल्पना नाही.

महामंडळाला निधी द्यावा असे या मंडळींना वाटण्यासाठी मंडळाने तेवढी आधी पुण्याई कमवायला हवी. त्याबाबत महामंडळाचा इतिहास फारच भीषण आहे. साहित्य संमेलन भरवणाऱ्या आयोजक संस्थेला महामंडळ ज्या हुकूमशाही पद्धतीने वागवत असते त्याच्या आजवरच्या कहाण्या एकत्रित करून जर त्याचे पुस्तक छापले तर आज जो निधी महामंडळाला मिळाला आहे तोसुद्धा मिळाला नसता. महामंडळाच्या यापूर्वीच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांच्यावर झालेली टीका जरी आज काढून पाहिली तरी महामंडळ लोकांपासून कसे तुटले होते ते लक्षात येईल. मराठी माणूस आजपर्यंत साहित्य संस्कृती आणि कला यासाठी उदार हस्ते मदत करत आलेला आहे. मात्र महामंडळ यापूर्वीच्या अनेक अध्यक्षांनी कसे एखाद्या मठासारखे चालविले होते हे विसरून चालणार नाही. या मंडळाचे याआधीचे काही अध्यक्ष खरोखरच लोकांशी जोडून राहिलेले आणि या मातीशी नाळ घट्ट जुळलेले होते. मात्र सगळ्याच अध्यक्षांनी असे केलेले नाही. या महामंडळाचे नियम आणि त्यांची कार्यपद्धती लक्षात घेतल्यावर हे महामंडळ लोकांपासून किती दूर आहे ते लक्षात येईल. मराठी साहित्य संमेलन भरवण्याचे काम महामंडळ करते त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया ही इतकी संकुचित आहे की या प्रक्रियेमुळे अनेक मान्यवर साहित्यिकांना अध्यक्ष होता आलेले नाही. महामंडळ अध्यक्ष निवडण्यासाठी ज्या लोकांना मतदार करते त्यांना कशाच्या आधारावर निवडते त्याची कल्पना आजपर्यंत महामंडळाने कधीही दिलेली नाही. हे मतदार निवडायचे निकष काय असतात, काय आहेत याबद्दल महामंडळाच्या आजपर्यंतच्या अध्यक्षांनी कधीही नीट माहिती दिलेली नाही. 12 कोटी मराठी भाषकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष फक्त अकराशे - बाराशे लोकांनी निवडायचा याची संगती कशी लावणार? 

जोशी स्वतः आक्रस्ताळे नाहीत. संस्थात्मक कार्य करण्यासाठी त्यांनी आजवर कष्ट घेतले आहेत. त्यांच्या कष्टाबद्दल दुमत नाही. मात्र ते सध्या कुठल्या संस्थेच्या अध्यक्षपदी आले आहेत आणि या संस्थेची जनमानसातली प्रतिमा (जी काही कणभर आहे ती) काय आहे याचा त्यांनी विचारच केला नाही. महामंडळाच्या अध्यक्षपदी आल्यावर त्यांनी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात केली, लोकांना निधीसाठी त्यांनी आवाहन केले, सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर केला पण त्यांना अपेक्षित होता तसा निधी जमा झाला नाही. मग मात्र त्यांचा पारा सुटला आणि मराठी माणसाला त्यांनी अकारण दूषणे दिली. महामंडळाने आजपर्यंत केलेले "अमूल्य' काम आणि मराठी साहित्यासाठी दिलेले "महान योगदान' लक्षात घेता मराठी माणसाने का निधी द्यावा असा प्रश्‍न आहे. बाबा आमटे यांची आनंदवन आणि अभय बंग यांची संस्था यांना मराठी माणसाने उदारहस्ते देणग्या दिल्या आहेत.

महामंडळाला निधी देताना त्याने नक्कीच उदारता दाखविली असती पण आपले दान सत्पात्री असावे अशी जर अपेक्षा त्याने ठेवली तर त्याचे काय चुकले. आधी महामंडळाने आपल्या कामातून आदर आणि लोकांमध्ये आपल्याबद्दल प्रेम निर्माण करावे आणि मग लोकांना देणगीसाठी आवाहन करावे. लोकांनी जर त्यानंतर देणगी दिली नाही तर नाराजी व्यक्त करावी. ज्या मराठी साहित्याचे आपण प्रतिनिधित्व करतो त्या क्षेत्रातल्या लेखक व प्रकाशकांनी आपल्याला निधी द्यावा यासाठी महामंडळाने आजपर्यंत त्यांना किती प्रेमाने वागवले हा इतिहास जोशी यांनी जरा तपासला तर बरे होईल.

महामंडळाचा इतिहास बदलण्यासाठी पुढच्या तीन वर्षात त्यांनी जर वाहून घेतले तर आज सव्वा लाख रुपये मिळाले आहेत, पुढं सव्वा कोटी सुद्धा मिळतील. आज ज्यांना त्यांनी मराठी साहित्य संमेलनासाठी मतदार म्हणून निवडले आहे त्यांना देणगीसाठी आवाहन करावे तसेच पुढीलवेळी साहित्यसेवा म्हणून या मतदारांकडून प्रत्येकी हजार रुपयांची देणगी मिळवून त्यांच्याकडून महामंडळाची सेवा घडवून घ्यावी आणि मंडळाच्या दरवर्षीच्या पाच लाखाच्या अनुदानातून काही बचत केली तरी खूप मोठा निधी उभा राहील. हे मतदार मराठी भाषेसाठी आणि मंडळासाठी खिशाला जरा झळ लावून घेतील का ते जोशी यांनी तपासावे आणि मगच लोकांच्या दानतीबद्दल खुशाल टीका करावी. मुळात महामंडळाला सरकारकडून 5 लाखाचे दरवर्षी अनुदान मिळते तेसुद्धा लोकांनी भरलेल्या करातूनच मिळते हे कधीही विसरले जाऊ नये.

Web Title: Vinayak Limaye write about Akhil Bhartiya Marathi Sahitya Mahamandal