"लेखी'च्या गुणांसाठी आता दिल्लीशी चर्चा 

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 12 जून 2019

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदापासून अंतर्गत गुण देण्याचे बंद करण्यात आले असून, त्यांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने अकरावी प्रवेशाच्या वेळी "सीबीएसई', "आयसीएसई' बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहीत न धरता केवळ त्यांच्या लेखी परीक्षेचे गुण गृहीत धरावेत आणि त्या गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश देण्यात यावेत, अशी मागणी मुख्याध्यापक आणि पालकांनी तावडे यांच्याकडे केली होती.

मुंबई - यंदा राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना कात्री लावत केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचे ठरविले आहे. आता याच पार्श्‍वभूमीवर "सीबीएसई' व "आयसीएसई' या बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर अकरावीस प्रवेश देण्यात यावा, त्यांच्या तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरले जाऊ नयेत म्हणून राज्याच्या शिक्षण मंत्रालयानेही पुढाकार घेतला आहे. यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी चर्चा करणार आहेत. यामुळे यंदा अकरावीच्या प्रवेशांना विलंब होऊ शकतो. 

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदापासून अंतर्गत गुण देण्याचे बंद करण्यात आले असून, त्यांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने अकरावी प्रवेशाच्या वेळी "सीबीएसई', "आयसीएसई' बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहीत न धरता केवळ त्यांच्या लेखी परीक्षेचे गुण गृहीत धरावेत आणि त्या गुणांच्या आधारावर अकरावीचे प्रवेश देण्यात यावेत, अशी मागणी मुख्याध्यापक आणि पालकांनी तावडे यांच्याकडे केली होती. या सूचनेचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. 

""मुख्याध्यापक आणि पालकांनी केलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकारच्या वतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, त्याचप्रमाणे "सीबीएसई', "आयसीएसई' बोर्ड यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल. दोन्ही मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचे गुण अकरावी प्रवेशासाठी गृहीत धरल्यास, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणता येईल, असा विचार मुख्याध्यापक आणि पालकांनी आज झालेल्या बैठकीत मांडला,'' असे तावडे यांनी सांगितले. 

वस्तुस्थिती काय 
गेल्या काही वर्षांतील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी पाहता "आयबी', "आयजीसीएसई' आदी बोर्डांचे 7 ते 9 टक्के विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेत असल्याचे आढळून आले आहेत. याहून विद्यार्थ्यांची संख्या जास्त नाही. "सीबीएसई' व "आयसीएसई' बोर्डाचे सुमारे साडेचार टक्के विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात, ही वस्तुस्थिती असल्याची बाब तावडे यांच्या या वेळी निदर्शनास आणून देण्यात आली. 

भीती अनाठायी 
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत "सीबीएसई', "आयसीएसई' बोर्डाच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य मिळेल, मात्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य मिळाणार नाही, अशी अनाठायी भीती व्यक्त करण्यात येत असून, या संदर्भात मुख्याध्यापक आणि पालक यांनी आजच्या बैठकीमध्ये ज्या सूचना दिल्या, त्याचा विचार करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. 

या बैठकीच्या वेळी शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रतिनिधी, सुमारे 15 शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच काही पालक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vinod tawde Now talk to Delhi for written points