यूपीएससी उत्तीर्ण असूनही अंधत्वामुळे नाकारली नोकरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

प्रभू, एेका प्रांजलची हाक

'युपीएससी'च्या परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये 773 व्या क्रमांकावर राहूनही महाराष्ट्राच्या प्रांजल पाटील यांना नियमानुसार केंद्रीय महसूल विभागात (आयआरएस) जॉब मिळालेला नाही. प्रांजल दिव्यांग आहेत. त्यांची हाक केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कानावर पोहचू दे...त्यासाठी ही बातमी Tweet करा केंद्रीय रेल्वेमंत्री @sureshpprabhu यांना

नाशिक - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपल्या गुणवत्तेवर आयआरएस पद मिळविणाऱ्या प्रांजल पाटील या जळगाव जिल्ह्याच्या प्रज्ञाचक्षू लेकीला रेल्वे विभागात नोकरीचे पत्र देण्यात आले. मात्र, आयोगासह रेल्वे विभागानेही या लेकीची अवहेलना करीत केवळ अंधत्वामुळे नोकरीच नाकारल्याची बाब समोर आली आहे.

शिक्षणाला जीवन समर्पित करणाऱ्या सावित्रीबाईंना आज दंडवत करणाऱ्या केंद्र व राज्याच्या लोकप्रतिनिधींकडे महिनाभर खेट्या मारणाऱ्या प्रांजलला आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखेर सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला आणि यानंतर जाग आलेल्या केंद्र सरकारने कनिष्ठ स्तराचा टपाल विभाग देत पुन्हा प्रज्ञाचक्षू प्रांजलची कुचेष्टा केली आहे.

प्रज्ञाचक्षू प्रांजल पाटील ही कठोर परिश्रमाने मे 2016 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत गुणवत्ता यादीत (रॅंक 773) आली. आयोगाकडून तिला रेल्वे विभाग देण्यात आला. दरम्यान, नोव्हेंबर 2016 मध्ये तिच्या सोबतच्या सहकाऱ्यांना 16 डिसेंबरपासून प्रशिक्षणासाठी हजर होण्याचे पत्र रेल्वेकडून देण्यात आले. मात्र, यात प्रांजलला डावलण्यात आले. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे विभागाशी तिने संपर्क साधला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने थेट रेल्वे विभागाचे राज्यमंत्री जितेंद्रप्रसाद यांची तिने 12 डिसेंबरला भेट घेतली. त्यांनी सचिव जोसेफ यांच्याशी चर्चा केली. दोन दिवसांत कळवितो, असे प्रांजलला सांगण्यात आले.

दोन दिवस वाट बघून काहीही उत्तर न आल्याने प्रांजलने रेल्वे विभागात जाऊन माहिती घेतली. रेल्वेच्या डीओबीटी विभागाने प्रांजल शंभर टक्के अंध असल्याने तिला प्रशिक्षणाचे पत्र पाठविण्यात आले नसल्याचे सांगितले. हे ऐकून प्रांजलला धक्का बसला. या संदर्भात तिने देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना माहिती कळविली. मात्र, त्यांनी कुठलीही दखल न घेतल्याने काल (ता. 2) आपल्या मित्रांच्या ग्रुपवर प्रांजलने आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आपल्या अवहेलनेचा मेसेज ट्‌विट केला. मित्रांनी हा मेसेज व्हायरल केला. सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजची प्रसारमाध्यमांनी आज दखल घेतली. यानंतर जाग आलेल्या केंद्र सरकार व युपीएससीने प्रांजलला सायंकाळी टपाल विभागात नोकरीचा मेल पाठविला.

अंध आणि अपंगांना केवळ दिव्यांग म्हणून उपयोग नाही, तर कोणत्याही परीक्षेत त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत. मला युपीएससीमधील रॅंकनुसार आयआरएसपदाची नोकरी मिळायला हवी. त्यामुळे केंद्र सरकारने देवू केलेली टपाल खात्यातील सेवा मी नाकारत आहे.
- प्रांजल पाटील

यापुढे तरी आयोगाने व प्रशासनाने विशेष लक्ष देऊन अंध व अपंग विद्यार्थ्यांचे मनोबल न खचू देता त्यांना उभारी मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करावी. कारण यापूर्वी असाच प्रकार जिल्हाधिकारी कृष्णगोपाल तिवारी यांच्या संदर्भातही झाला आहे.
- यजुर्वेंद्र महाजन, संस्थापक, मनोबल केंद्र, जळगाव

Web Title: Visually impaired Pranjal Patil cracks IAS in first attempt