विठ्ठलाच्या दानपेटीत १४ देशांचे परकी चलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

गेल्या वर्षभरात जगभरातील १४ देशांतील पर्यटकांनी विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेतले आहे. मंदिरातील देणगी पेट्यांमध्ये १४ देशांचे परकी चलन आढळून आले आहे. वर्षभरात जवळपास ४० ते ५० हजार रुपयांची परदेशी देणगी मिळाली आहे.
- सुरेश कदम, लेखाधिकारी, विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर

पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दानपेटीत परकी चलन येऊ लागले आहे. वर्षभरात मंदिरातील देणगी पेट्यांमध्ये विविध १४ देशांमधील परकीय चलन मिळाले आहे.

विविध माध्यमांमुळे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्‍मिणीची महती देश-विदेशात पोचली आहे. वर्षभरात देश-विदेशातून जवळपास एक कोटीहून अधिक भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी-कार्तिकी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी तर विदेशातील अनेक पर्यटक आवर्जून पंढरीत हजेरी लावतात. गेल्या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, सिंगापूर, युरोप, कोरिया, मलेशिया, बहारीन, ओमान, कतार, नेपाळ, थायलंडसह सौदी अरेबियातील लोकांनी विठूमाउलीचे आशीर्वाद घेतले आहेत. विदेशातील भाविकांकडून वर्षभरात जवळपास ५० हजार रुपयांची देणगी मिळाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vittal Pandharpur Donation Box Foreign Currency