विठुरायाच्या देणग्यांत पाच कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

झोळीत ५० लाखांची चिल्लर 
अनेक वेळा चिल्लरच्या पैशांवरून बाजारात आणि सार्वजनिक व्यवहारात अडचणींना सामोरे जावे लागते. काही वेळा अधिकच्या चिल्लरमुळे समस्याही निर्माण होते. अशाच वाढत्या चिल्लरच्या नव्या समस्येला विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला सध्या सामोरे जावे लागत आहे. स्थानिक बॅंकांनी चिल्लर घेण्यास नकार दिल्याने ‘कोणी चिल्लर घेता चिल्लर’ अशी हाक देण्याची वेळ मंदिर समितीवर आली आहे. सध्या मंदिर समितीकडे वर्षभरापासून सुमारे ५० लाखांची चिल्लर पडून असून, या साठ्यामुळे मंदिर समितीची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय आर्थिक नुकसानही होत आहे. गरिबांचा देव असलेला विठ्ठल आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध होऊ लागला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक पंढरीत येतात. दर्शनानंतर भाविक देवाला आपापल्या ऐपतीप्रमाणे देवाच्या पायांजवळ दान अर्पण करतात. यामध्ये पाच रुपये, दहा रुपये, एक रुपया अशा नाण्यांचा समावेश असतो. त्याचबरोबर देणगी पेट्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर भाविकांकडून चिल्लरच्या स्वरूपात दान टाकले जाते. दररोज मंदिर समितीच्या देणगी पेट्यांमध्ये अंदाजे १४ ते १५ हजार रुपयांची चिल्लर जमा होते. महिन्याभराची जमा झालेली चिल्लर बॅंकेत जमा केली जाते. मात्र गेल्या वर्षभरापासून येथील स्थानिक बॅंकांनी मंदिर समितीची चिल्लर जमा करून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने सुमारे ४९ लाख ३८ हजार रुपयांची चिल्लर मंदिरात पडून आहे.
---
गुंतवणूक करा मगच विचार करू
विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे येथील कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक, स्टेट बॅंक आदी बॅंकांमध्ये खाती आहेत. या बॅंकांकडे मंदिर समितीने वेळोवेळी पाठपुरावा करून चिल्लर जमा करून घ्यावी यासाठी लेखी पत्र देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र या बॅंकांनी मंदिर समितीची चिल्लर स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उलट मंदिर समितीने मोठी गुंतवणूक केल्यास चिल्लर जमा करून घेण्यावर विचार करू, अशी अट काही बॅंकांनी समितीला घातली आहे.
---
(कोट)
---
विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला दररोज अंदाजे १५ हजार रुपयांची चिल्लर देणगीच्या स्वरूपात मिळते. मागील वर्षभरात सुमारे ५० लाख रुपयांची चिल्लर जमा झाली आहे. ती बॅंकेत जमा करण्यासाठी नेली असता, बॅंकांनी जमा करून घेण्यास नकार दिला आहे. दोन महिन्यांपूर्वी आरबीआयकडेच थेट पत्रव्यवहार केला आहे. अजून कोणतेच उत्तर प्राप्त झाले नाही. 
- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर

पंढरपूर - यंदा दुष्काळी परिस्थिती तसेच बाजारातील उलाढाल मंदावलेली असताना गरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठलाच्या देणग्यांमध्ये मात्र यंदा तब्बल पाच कोटींची भरीव वाढ झाली आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे उत्पन्न ३१ कोटी १६ लाखांवर पोचले आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला २०१७-१८ या वर्षात सुमारे २६ कोटी ५६ लाख इतके उत्पन्न मिळाले होते. यावर्षी त्यात सुमारे पाच कोटी रुपयांची वाढ होऊन उत्पन्न ३१ कोटी १६ लाखांवर पोचले आहे. एकूण उत्पन्नापैकी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि विविध विकासकामे, यासाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

मंदिर समितीच्या उत्पन्नात भरीव वाढ झाल्याने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या कल्पनेतून पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम, अन्नछत्र, गोशाळा या उपक्रमांसह भाविकांना अनेक चांगल्या सुविधा पुरविल्या जात आहेत. विविध बॅंकांमध्ये मंदिर समितीच्या सुमारे ७५ ते ८० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्याचे सुमारे सहा कोटी रुपये व्याज समितीस मिळत आहे.

विविध माध्यमांतून उत्पन्न
मंदिरातील सर्व हुंडीपेटीत पाच कोटी ५३ लाख, श्री विठ्ठलाच्या चरणाजवळ जमा झालेले तीन कोटी ४० लाख, श्री रुक्‍मिणीमातेच्या चरणाजवळ जमा झालेले एक कोटी सात लाख, बुंदी लाडूविक्रीतून दोन कोटी ६५ लाख, देणग्यांतून चार कोटी ८३ लाख, परिवार देवतांकडील देणग्यांतून एक कोटी २८ लाख, नित्यपूजा देणगीतून एक कोटी तीन लाख, चंदनउटी पूजेतून २६ लाख, मनिऑर्डर देणगीचे एक लाख ९८ हजार, परदेशी चलनातून १७ हजार आणि अन्य सुमारे ४० लाख रुपये.

Web Title: Vittal Rukmini Temple Pandharpur Donation Increase