#VoteTrendLive मुंबईत धनुष्यबाण! नाशकात 'इंजिन' जाम

#VoteTrendLive Shivsena leading in Mumbai
#VoteTrendLive Shivsena leading in Mumbai

मुंबई - शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारा भाजप तोंडघशी पडला आहे. शिवसेनेने सुरवातीच्या दोन तासांतच 70 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले.

मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागांसाठी 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाच्या माहितीचा गोषवारा त्या-त्या प्रभागातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला होता. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, स्थावर आणि जंगम मालमत्ता, त्याच्यावरील गुन्हे आणि त्याला झालेली शिक्षा असा सर्व तपशील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक महत्त्वपूर्ण होती.

प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्विनी घोसाळकर यांनी विजय मिळवत शिवसेनेने पहिला विजय मिळविला. मुंबई महापालिकेत शिवसेनेची पहिल्यापासून आघाडी घेतली होती. 150 वॉर्डमध्ये गोंधळामुळे मतमोजणी थांबविण्यात आली होती. अखेरच्या माहितीनुसार शिवसेनेने 75, भाजप 42, काँग्रेस 14, मनसे 9, राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर होते. 

नाशिकमध्ये 'इंजिन'ला ब्रेक! 
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्चस्व असलेल्या नाशिक महानगरपालिकेसाठी यंदा 122 जागांसाठी झालेल्या मतदानामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भाजप 15 जागांवर, शिवसेना 9 जागांवर तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस प्रत्येकी एका जागावर विजयी ठरले आहेत. 

प्रभाग क्रमांक आठमधील चारही जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. तेथे नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे, संतोष गायकवाड, विलास शिंदे विजयी ठरले आहेत. यापूर्वी 40 जागा जिंकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ 2 जागांवर आघाडी मिळाली आहे. नाशिकमधील एकूण 32 प्रभागांपैकी 29 प्रभाग हे चार सदस्यांचे तर दोन प्रभाग हे तीन सदस्यांचे आहेत. काही ठिकाणी मतदानावर घातलेला बहिष्कार आणि नेहमीप्रमाणेच बोगस मतदानाच्या तक्रारी सोडल्या तर यंदाची मतदानप्रक्रिया शांततेत आणि सुरळित पार पडली. यंदा 61.60 टक्के मतदान झाले.

मतदानामध्ये राज्यात आघाडीवर असलेल्या शहरांच्या यादीत नाशिकला तिसरे स्थान मिळाले. 
भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले किंवा भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर प्रभाग क्रमांक एक मधील रंजना भानसी या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

नागपूरला भाजपला अपेक्षित आघाडी

नागपूर- महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू होता भाजप आघाडी घेत आपल्या बालेकिल्ल्यात विजयी संकेत दिले, तर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जाणारा असदुद्दीन ओवैसी यांच्या MIMने खाते उघडण्याची शक्यता दिसू लागली. 

प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी सुजाता गजभिये यांना पराभूत करीत भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. आमदार गजभिये यांना जोरदार धक्का बसला आहे. 
भाजपचे अमर बागडे, हृतिक मसराम, परिणीती फुके, वर्षा ठाकरे यांचा या प्रभागातून विजय झाला. प्रभाग 10 ड-मध्ये काँग्रेसच्या गार्गी चोप्रा 3254 मतांनी आघाडीवर होत्या. त्यांना एकूण 7771 मते मिळाली होती. त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या चंदा ठाकूर यांना एकूण 4571 मते मिळाली. चोप्रा यांचा विजय निश्चित होण्याच्या मार्गावर होता. प्रभाग एक आणि 36 मध्ये भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली होती. दरम्यान, प्रभाग क्रमांक 31 मध्ये काँग्रेसचे प्रशांत धवड, गुड्डू तिवारी आघाडीवर होते. तसेच, शिवसेनेचे अनिल धावडे हेही त्यांच्या प्रभागात पुढे होते. मोमीनपुरा भागात एका जागेवर MIMने आघाडी घेत येथेही प्रस्थापितांना धक्का देण्याचे संकेत दिले आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळातच महापालिकेत 7 जागांवर भाजपला आघाडी मिळाली. त्यानंतर एक तासात ही आघाडी 11 जागांवर पोचली. त्यावेळी काँग्रेसला मात्र केवळ एका जागेवर आघाडी होती. झोन क्रमांक 11 मधील जिप शाळेच्या मतमोजणी परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यास त्यांनी सुरवात केली. वातावरणाचा अंदाज घेऊन पोलिसांनी घोषणा देण्यास मनाई केली आहे. तसे आदेश कालच (बुधवारी) जारी केले होते. सकाळी साडेअकरा वाजता नागपूर भाजप 19 जागांवर आघाडीवर होती. तर काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर, तसेच राष्ट्रवादीने एका जागेवर आघाडी मिळवत खाते उघडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधून भाजप
चे चारही उमेदवार आघाडीवर होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com