भाजप-शिवसेना युती न झाल्यास मतविभाजनाचा फायदा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यामुळे राज्यभरात इतरत्रही आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांची चर्चा लवकरच होणार असल्याचे समजते. 

मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यामुळे राज्यभरात इतरत्रही आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांची चर्चा लवकरच होणार असल्याचे समजते. 

राज्यातील दहा महापालिका आणि 16 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद तोळामासाची असल्याने आघाडी करण्यास कॉंग्रेसने स्पष्ट नकार दिला आहे; मात्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुढकार घेत ठाणे महापालिकेत आघाडी करण्याबाबत यशस्वी शिष्टाई केली. राणे यांच्या भूमिकेला जितेंद्र आव्हाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे ठाण्यात दोन्ही कॉंग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हाच पॅटर्न राज्यात इतरत्र राबविता येईल का, याबाबत दोन्ही कॉंग्रेसचे नेते कामाला लागले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंववड महापालिकेत आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस सकारात्मक असल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी "सकाळ'ला दिली. तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून, याबाबतचे अहवाल दोन दिवसांत प्रदेश कॉंग्रेसकडे येणार आहेत. ठाण्याच्या धर्तीवर अन्य ठिकाणी आघाडी झाल्यास स्थानिक निवडणुकीत वेगळे चित्र पाहावयास मिळेल, असे सावंत यांनी सांगतिले. 

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्‍यता धूसर होत आहे. त्यांची युती न झाल्यास युतीमध्ये तुंबळ युद्ध होणार आहे. त्यांच्या मतविभाजनाचा फायदा दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीला होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. 

अन्य महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होण्याबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. यासंदर्भातील अहवाल एक-दोन दिवसांत प्राप्त होतील. येत्या 25 जानेवारी रोजी पक्षाच्या संसदीय समितीची बैठक होणार आहे. या अहवालाच्या आधारे आघाडी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. 

सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Web Title: voting of the partition advantage