'या' गावांत झाले शून्य टक्के मतदान; मतपेट्या गेल्या रिकाम्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

गावांत कोणीच मतदान केले नसल्याने मतपेट्या रिकाम्याच न्याव्या लागल्या. सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. 

डहाणू : वाढवण बंदराच्या आणि "डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण' बरखास्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ पालघर विधानसभा मतदारसंघातील डहाणूच्या किनारपट्टीवरील गावांनी मतदानावरच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे मतपेट्या रिकाम्याच न्याव्या लागल्या. सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. 

डहाणू किनारपट्टीवरील टीघरेपाडा, वाढवण, वरोर, धाकटी डहाणू, गुंगवाडा, तडियाळे, वासगाव, पोखरण, बहाड, चिंचणी या गावांनी स्वयंस्फूर्तीने आजच्या मतदानावर बहिष्कार टाकला. याशिवाय बहिष्काराचे लोण चंडीगाव, आसनगाव, ओसार, धूमकेत, तारापूर काम्बोडे, उच्छेळी, दांडी या गावातही पसरल्याने तेथेही अत्यंत अल्प मतदान झाले. किनारपट्टीवरील नागरिकांनी आजच्या मतदानावर स्वयंस्फूर्तीने बहिष्कार टाकल्यामुळे सकाळपासूनच मतदान केंद्राकडे कोणीही फिरकले नाही. एवढेच नव्हे; तर मतदान केंद्रावर पोलिंग एजंट म्हणूनही कोणी बसले नाही. तसेच मतदान केंद्राबाहेर कोणत्याही राजकीय पक्षाचे बुथ लागले गेले नाहीत. मतदान केंद्रात सरकारी कर्मचारी तेवढे बसले होते.

आजच्या या अभूतपूर्व बहिष्कारामुळे मोदी सरकारला, जनतेच्या वाढवण बंदराविरोधातील तीव्र भावना समजतील आणि त्यातून ते भविष्याच्या दृष्टीने योग्य धडा घेतील, असा विश्‍वास वाढवण बंदरविरोधी कृती समितीने व्यक्त केला. 

खासदारांचा प्रयत्न निष्कळ 

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी येथील लोकांची भेट घेऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका सांगितली होती. त्याच वेळी खासदार राजेंद्र गावित यांनीही बंदर हटवण्यासंदर्भात संसदेत प्रश्‍न मांडून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि अखेर मतदानावर बहिष्कार टाकला गेला. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting in these villages was zero percent; Ballot boxes empty