एसटीमध्ये "व्हीटीएस' प्रणाली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

एसटी चुकल्यावर पुढची गाडी कधी येणार, हे प्रवाशांना आता मोबाईलवरही सहज समजू शकणार आहे. एसटी महामंडळ प्रत्येक बसमध्ये व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसवत असून त्यामुळे एसटीचे वेळापत्रक तपासणे शक्‍य होणार आहे.

मुंबई -  एसटी चुकल्यावर पुढची गाडी कधी येणार, हे प्रवाशांना आता मोबाईलवरही सहज समजू शकणार आहे. एसटी महामंडळ प्रत्येक बसमध्ये व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम (व्हीटीएस) बसवत असून त्यामुळे एसटीचे वेळापत्रक तपासणे शक्‍य होणार आहे. या वर्षाअखरेपर्यंत सर्व बसमध्ये "व्हीटीएस' यंत्रणा बसवण्यात येणार आहे. 18 हजार 500 गाड्यांमध्ये हे यंत्र बसवण्यात येणार असून त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही तत्काळ मदत पोहचवणे शक्‍य होणार आहे. 

राज्य परिवहन महामंडळाने खासगी बस व्यवसायाच्या तुलनेत बस सेवा पुरवण्यासाठी अत्याधुनिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बस मध्ये "जीपीएस'च्या माध्यमातून "व्हीटीएस' लावण्यात येणार आहे. सुरुवातीला नाशिक विभागातील सुमारे 150 बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र, आधुनिक जीपीएस लावण्यासाठी वेळ होत असल्याने डिसेंबर 2019 अखेर राज्यातील इतरही विभागांत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. परिणामी बसचे ठिकाण, अधिकृत थांबे, अनधिकृत थांबे, अपघात अशा विविध विषयांवर महामंडळाला एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवता येणार आहे. 

"व्हीटीएस'मध्ये अनेक प्रकारच्या विविध सुविधा देण्याचा प्रयत्नसुद्धा एसटी महामंडळाचा आहे. त्यासाठीही चाचण्या सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर ऍपच्या माध्यमातून नागरिकांना त्याची सुविधा घेता येणार आहे. एखाद्या प्रवाशाचा प्रवास लांबल्यास त्याची प्रतीक्षा करणाऱ्यांनाही या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून त्याचे निश्‍चित ठिकाण समजणार आहे. 

चालकांच्या मनमानीला चाप 
बसचे अधिकृत आणि अनधिकृत थांब्यावरसुद्धा नजर ठेवण्यात येणार आहे. इतर वेळेत अधिकृत थांब्यावरही चालक बस थांबवत नसून अनधिकृत ठिकाणी बस थांबवताना दिसून येतो. मात्र, सध्या महामंडळाकडे अशा चालकांवर कारवाईसाठी पुरावे नसल्याने "व्हीटीएस'मुळे वाहनाचे ठिकाण तपासून वाहनाला निश्‍चितस्थळी पोहचण्यास उशीर झाल्यास चालकाला जाब विचारला जाणार आहे. 

"व्हीटीएस' प्रकल्प एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या प्रकाल्पाला योग्य पद्धतीने जनतेसाठी सुरू करण्यासाठी सध्या काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर रितसर प्रवाशांसाठी सुविधा सुरू करण्यात येणार आहेत. 
- मनोज लोहिया, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी. 

नव्या सुविधा 
- एसटीचे ठिकाण कळणार 
- एसटीचे नियोजन करण्यात मदत 
- अपघाताचे क्षेत्र माहिती होणार 
- जवळचे पोलिस ठाणे आणि हॉस्पिटल जोडणार 
- एसटीचा वेग कळणार 
- एसटीचा वेळही कळणार 
- अवैध वाहतुकीला आळा बसणार. 
 

Web Title: VTS system in ST bus

टॅग्स