राज्यातील शाळांतही "वॉटर बेल' 

संतोष शाळिग्राम
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाणी पिण्याचे कमी प्रमाण आणि त्यातून उद्‌भवणाऱ्या शारीरिक समस्या टाळण्यासाठी केरळच्या धर्तीवर पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी राज्यातील सर्वच शाळांमध्ये "वॉटर बेल' हा उपक्रम राबविला जावा.

पुणे- शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाणी पिण्याचे कमी प्रमाण आणि त्यातून उद्‌भवणाऱ्या शारीरिक समस्या टाळण्यासाठी केरळच्या धर्तीवर पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी राज्यातील सर्वच शाळांमध्ये "वॉटर बेल' हा उपक्रम राबविला जावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. शाळांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तालयाने दिल्या आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

केरळमध्ये "वॉटर बेल'चा प्रयोग करण्यात आला. त्याची समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. विद्यार्थ्यांना पाणी प्यावे, यासाठी विशिष्ट कालमर्यादेत घंटा वाजविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला होणारा फायदा लक्षात घेऊन आता शहरातील काही शाळांनी हा प्रयोग सुरू केला आहे. एकेका तासाने विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी आठवण करून दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनाही पाणी प्यावे लागते. 

कसबा पेठ परिसरातील चिल्ड्रन ऍकॅडमी हायस्कूलच्या अध्यक्षा शमा खोत यांनी आणि धायरी फाटा येथील नोबल संस्कार स्कूलच्या योगेश कुलकर्णी यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक घड्याळी तासाला एक घंटानाद केला जातो. मग शिक्षक विद्यार्थ्यांना पाण्याची बाटली काढण्यास सांगतात आणि पाणी पिण्याची सूचना केली जाते. बिबवेवाडी येथील पूना ग्लोबल स्कूलचे सचिव अशोक चावर पाटील यांनीही हा उपक्रम शाळेत सुरू केला आहे. 

शाळांमध्ये सलग तास असतात आणि नंतर मुले खेळांमध्ये रमतात. त्यात पाणी पिण्याची आठवण राहत नाही. उन्हाळ्यात घामावाटे पाणी जाते. परंतु, पुरेसे पाणी प्यायले जात नाही. त्यामुळे चक्कर येणे, स्नायू दुखणे, तरतरीतपणा नसणे, तोंडाला कोरड पडून दात खराब होणे, अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे पुरेसे पाणी पिण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. 
- डॉ. शशीकांत दुधगावकर, बालरोगतज्ज्ञ 

केरळमधील उपक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातही सुरू झाला पाहिजे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. त्यांच्यामार्फत हा उपक्रम शाळांमध्ये सुरू करता येईल. खासगी शाळांनीही पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवावा, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सूचना करण्यात आल्या आहेत. 
- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water bell in schools across the state