पाणी फाउंडेशनला प्रेरणा हिवरेबाजारचीच - आमीर खान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

"वॉटर कप'मुळे राज्यात मोठी क्रांती झाली. लोकसहभाग, पाण्याचा संचय आणि सेंद्रिय शेती या तीन गोष्टी आजच्या काळात महत्त्वाच्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे पाठबळ आहे. आमीर खान यांनी सुरू केलेले काम मोठे असून, त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. त्यांचे हे काम केवळ राज्य किंवा देशासाठीच नव्हे, तर जगासाठी पथदर्शी आहे.'' 
- पोपटराव पवार, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष 

नगर - ""पाणी फाउंडेशनच्या कामाची सुरवातच हिवरेबाजार येथील कामांची प्रेरणा घेऊन झाली आहे. हे गाव आमच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहण्यासाठी हिवरेबाजारचे प्रोत्साहन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,'' असे गौरवोद्‌गार पाणी फाउंडेशनचे प्रमुख आणि अभिनेते आमीर खान यांनी आज काढले. 

आमीर खान यांनी आज पत्नी किरण राव यांच्यासह हिवरेबाजारला भेट देऊन तेथील विविधकामांची पाहणी केली. या दोघांनी हिवरेबाजारच्या डोंगरापासून पायथ्यापर्यंत केलेल्या विविध कामांची पाहणी केली. आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावातील विविध योजनांची माहिती दिली. व्यायामशाळेत बसविलेल्या साहित्याचे उद्‌घाटन खान दांपत्याच्या हस्ते झाले. त्यानंतर आमीर खान यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

आमीर खान म्हणाले, ""सत्यमेव जयते''च्या टीमने पाणी क्षेत्रात काम करण्याचे ठरविल्यानंतर नेमके काय आणि कशी सुरवात करायची, हा प्रश्‍न होता. या क्षेत्रात हिवरेबाजारचे काम मोठे आहे. त्यामुळे पोपटराव पवार, डॉ. गिरीष कुलकर्णी यांना मुंबईत बोलविले. त्या वेळी झालेल्या बैठकीत आम्ही तयार केलेली "ब्ल्यू प्रिंट' दाखविली. आमचे काम लोकसहभागातून असल्याने त्याला निश्‍चित यश येईल, अशा शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे हे काम सुरू करण्याचे धाडस आम्ही केले. सुरवातीला तीन तालुक्‍यांमध्ये, नंतर 30 तालुक्‍यांमध्ये आणि यंदा 75 तालुक्‍यांमध्ये पाणी फाउंडेशनने "वॉटर कप' स्पर्धेच्या माध्यमातून कामे हाती घेतली आहेत.'' 

आमीर म्हणाले, ""दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आम्ही हिवरेबाजारकडून मिळालेल्या प्रोत्साहनातून आणि त्यांच्याकडून होणाऱ्या मदतीतून पाहिले आहे. या गावात आज काही तासांसाठी आलो असलो, तरी भविष्यात दोन-तीन दिवसांच्या मुक्कामासाठी येथे येणार आहे. विविध कामांबाबत पोपटरावांकडून माहिती घेणार आहे.'' 

Web Title: Water Foundation has inspired hirve bazar