जलजन्य आजारांचा राज्यभरात उद्रेक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

दुष्काळामुळे वाढत जाणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे राज्यावर जलजन्य आजारांचे संकट आले आहे. अतिसार, जुलाब, काविळ अशा आजारांचा उद्रेक राज्याच्या वेगवेगळ्या भागात वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे.

पुणे - दुष्काळामुळे वाढत जाणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे राज्यावर जलजन्य आजारांचे संकट आले आहे. अतिसार, जुलाब, काविळ अशा आजारांचा उद्रेक राज्याच्या वेगवेगळ्या भागात वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे.

राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि पश्‍चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष्य जाणवत आहे. गावांतील भूजलाची पातळी खालवली आहे. जमिनीवरील जलस्रोतांनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अलबंबून राहाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाणी दूषित असल्याने त्याचा थेट परिणाम राज्यातील जलजन्य आजारांच्या उद्रेकावर होत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यातील कोल्हापूर, रत्नागिरी, यवतमाळ येथे काविळ, गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. 

पाण्याची पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात. हे दूषित पाणी पिण्यात आल्याने जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो आदी जलजन्य आजार होतात. दूषित पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रोचे ५३ रुग्ण नुकतेच रत्नागिरीत आढळले, अशी माहिती विभागाने दिली आहे.

हे आवश्‍य करा
  पाणी पिताना शुद्ध करून पिणे. 
  उकळून थंड केलेलं पाणी प्यावे. 
  मेडिक्‍लोर ड्रॉप्स पाण्यात टाकल्यानंतर ते प्यावे. 
  पाण्यात तुरटी फिरवावी.
  उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होते. त्यावेळी मीठ- साखर पाणी सतत प्यावे.

राज्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येते. या वर्षी आतापर्यंत रत्नागिरी येथे गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे तर, कोल्हापूर आणि यवतमाळ येथील काविळीच्या उद्रेकात २०७ रुग्णांची नोंद झाली. 
- डॉ. प्रकाश भोई, सहायक संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

Web Title: Water Pollution Sickness Health Care