भूमिगत कालव्यामुळे पुण्याला पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

मुंबई - खडकवासला ते फुरसंगी 32 किलोमीटरचा टनेल (भूमिगत कालवा) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या टनेलमुळे तब्बल 3 टीएमसी अतिरिक्त पाणी पुण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. 

मुंबई - खडकवासला ते फुरसंगी 32 किलोमीटरचा टनेल (भूमिगत कालवा) उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या टनेलमुळे तब्बल 3 टीएमसी अतिरिक्त पाणी पुण्यासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

खडकवासला धरणाच्या मुठा उजवा कालव्याची भिंत फुटल्याबाबत कॉंग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री शिवतारे म्हणाले, ""हा कालवा सतत प्रवाही असल्यामुळे 25 वर्षांत दुरुस्तीच करता आली नाही. दुरुस्तीसाठी कालवा बंद ठेवल्यास पुण्याच्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला असता. या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान 32 किलोमीटरचा टनेल उभारण्यात येणार आहे. या टनेलमुळे बाष्पीभवन, पाणीचोरीसारखे प्रकार थांबणार असल्याने पुणे महानगर क्षेत्राला अतिरिक्त तीन टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. शिवाय, कालव्याची जमीन वाचल्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाला तब्बल 10 ते 15 हजार कोटी किमतीची 3084 हेक्‍टर जमीन उपलब्ध होणार आहे. या अतिरिक्त निधीतून महामंडळाच्या अन्य योजना मार्गी लागण्यास मदत होणार आहे.'' 

धरणाच्या जवळून रफाल बनविण्याच्या कंपनीला केबल टाकण्याचे काम दिल्याने कालवा फुटला का, असा प्रश्न या वेळी गाडगीळ यांनी उपस्थित केला होता. याला उत्तर देताना शिवतारे यांनी गाडगीळ यांची शंका फेटाळून लावली. संबंधित कंपनीला केबल टाकण्यासाठी संरक्षण मंत्रालय, जलसंपदा विभाग, महापालिका आयुक्तांची परवानगी घेण्यात आली होती, अशी माहिती सभागृहाला दिली. 

घुशी, खेकड्यांमुळेच कालवा फुटला  
घुशी आणि खेकड्यांमुळे उजवा कालवा फुटल्याचे शिवतारे यांनी ठासून सांगितले. ते म्हणाले, ""घुशी, खेकड्यांमुळे विविध ठिकाणी कालव्याची अक्षरश- चाळण झाल्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर लक्षात आले. विभागाच्यावतीने 14 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कालव्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. कालवा फुटीच्या चौकशीचा अहवाल 15 डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. बाधित कुटुंबांना तीन कोटींची मदत जाहीर करण्यात आली असून, त्यातील 1 कोटी 92 लाख वितरित करण्यात आले आहेत. 30 बाधित कुटुंबांचे झोपु योजनेतून, तर 38 कुटुंबांचे अन्य योजनेतून पुनर्वसन केले आहे.''

Web Title: Water from Pune due to underground canal