ऐन पावसाळ्यात राज्यात ४,७१६ टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

यंदा जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरीही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत टॅंकरची संख्या घटली असली, तरीही राज्यात ऐन पावसाळ्यात चार हजार ७१६ टॅंकर सुरू आहेत. सोलापूरसह मराठवाड्यात सर्वांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

माळीनगर (जि. सोलापूर) - यंदा जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरीही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. उन्हाळ्याच्या तुलनेत टॅंकरची संख्या घटली असली, तरीही राज्यात ऐन पावसाळ्यात चार हजार ७१६ टॅंकर सुरू आहेत. सोलापूरसह मराठवाड्यात सर्वांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

गतवर्षी राज्यात आजच्या तारखेला ४५९ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यातुलनेत यंदा ९७ टक्के अधिक टॅंकर सुरू आहेत. राज्यातील तीन हजार ६५७ गावे व नऊ हजार १४९ वाड्यांना चार हजार ७१६ टॅंकरने पाणी पुरविले जाते. ‘टॅंकरमुक्त महाराष्ट्र’ची विद्यमान सरकारची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. 

मराठवाडा विभागात दोन हजार २७२ टॅंकर सुरू आहेत. औरंगाबादसह (६६७ टॅंकर), बीड (६६४ टॅंकर), जालना (३६८ टॅंकर), उस्मानाबाद (२२३ टॅंकर), नांदेड (१३० टॅंकर), लातूर (१०३ टॅंकर) जिल्हे तहानलेले असल्याने टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोकणात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तेथील टॅंकरची संख्या शून्यावर आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water shortage 4716 water tanker in maharashtra rainy season