एप्रिल महिन्यातच टंचाईच्या झळा!

सिद्धेश्‍वर डुकरे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

460 गावे, 247 वाड्यांना 671 टॅंकर

460 गावे, 247 वाड्यांना 671 टॅंकर
मुंबई - मॉन्सून गेल्यावर्षी चांगला झाला असला तरी यंदा एप्रिल महिन्यात राज्यात टंचाईच्या झळा जाणवत आहेत. 460 गावे आणि 247 वाड्यांवर सध्या 670 टॅंकर सुरू आहेत. सर्वांत जास्त टॅंकर औरंगाबाद विभागात (396) आहेत. याचबरोबर जलाशयांतील साठा आदल्या वर्षीच्या तुलनेत (2017 च्या) जास्त असला तरीही तो जेमतेम 35.39 टक्‍के इतका खाली आहे. सर्वांत कमी 17.87 टक्‍के इतका जलाशय साठा नागपूर विभागात आहे.

राज्यात गेल्यावर्षी चांगल्या पावसाची नोंद झाल्याने सर्व प्रकारचे जलाशय भरले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, याची शक्‍यता बळावली होती. मात्र, एप्रिलमध्येच ही टंचाई निर्माण झाली असून, औरंगाबाद विभागात सरकारी तसेच खासगी टॅंकरची संख्या दर आठवड्याला वाढत आहे. महसूल विभागावर विचार केला, तर सर्वांत कमी टॅंकर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात (4) सुरू आहेत.

सध्या कडक उन्हामुळे तापमानात विक्रमी वाढ होत आहे. परिणामी जलासाठे बाष्पीभवनामुळे वेगाने कमी होत आहेत. सध्या अवकाळी पावसाच्या घटना घडत असल्या तरी मॉन्सूनच्या आगमनाला अद्याप दोन- अडीच महिने बाकी आहेत, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग असाच वाढत राहिला तर त्याचा शेती व उद्योगाचे पाणी यावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबरोबर शेती, उद्योसाठीचे पाणी याचीही टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

उन्हाळ्याच्या झळा...
- सर्वांत जास्त टॅंकर औरंगाबाद जिल्ह्यात - 396
- सर्वांत कमी टॅंकर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात - 4
- राज्यातील खासगी टॅंकरची संख्या - 562
- राज्यातील सरकारी टॅंकरची संख्या - 109

35.39 टक्‍के - जलाशयांतील सध्याचा साठा
28.89 टक्‍के - जलाशयांतील गेल्यावर्षीचा साठा

Web Title: water shortage monsoon rain