जल-माती कलशांची भव्य मिरवणूक

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 डिसेंबर 2016

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज
मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांवरील पवित्र माती तसेच जिल्ह्यांतील नद्यांचे जल असलेले कलश आज सकाळी मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ संकलित करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आज सकाळी चेंबूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर या कलशांची मिरवणूक काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (शनिवारी) शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार आहे.

शिवस्मारकासाठी राज्यभरातील 36 जिल्ह्यांतून आणलेल्या 72 कलशांमधील पाणी चेंबूर येथे एकत्र करण्यात आले. त्यानंतर हे जल चेंबूरपासून शीव, दादर, परळ, लालबाग, गिरगाव मार्गे गेट वे ऑफ इंडिया येथे आणण्यासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, आमदार विनायक मेटे आदी उपस्थित होते. आज सकाळी चेंबूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जल्लोषाने परिसर निनादून गेला होता.

मानापमान नाट्य
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी शोभायात्रा अर्धवट सोडून दिल्याने भूमिपूजन कार्यक्रमापूर्वीच मानापमान नाट्याचा दुसरा अध्याय सुरू झाला. मिरवणूक सुरू होण्यापूर्वी विनायक मेटे चेंबूरमधल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते; मात्र, त्यांनी मिरवणुकीत सहभागी होणे टाळले. कलशांची मिरवणूक म्हणजे भाजपचे निव्वळ शक्तिप्रदर्शन असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केले जात असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. हा कार्यक्रम महाराजांच्या सन्मानासाठी नाही, तर केवळ शतप्रतिशत भाजप हा अजेंडा राबवण्यासाठीच दिसत आहे. वातावरण शिवमय वाटण्याऐवजी भाजपमय वाटत आहे, अशा शब्दांत मेटेंनी भाजपवर टीका केली.

Web Title: water-soil kalash rally