राज्यातील 350 गावांत टॅंकरने पाणीपुरवठा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई - पावसाने महाराष्ट्राचा अद्याप पूर्ण निरोप घेतलेला नसतानाच राज्यातील जवळपास साडेतीनशे गावांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा गावांची संख्या दुपटीने वाढली असल्याने पुढील वर्षी पिण्याच्या भीषण पाणीटंचाईचा सामना राज्याला करावा लागण्याची शक्‍यता आहे.

गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली नव्हती. यंदा मात्र राज्यात सरासरी केवळ 78 टक्‍के पाऊस पडल्याने ऑक्‍टोबरच्या पहिल्याच आठवड्यात पिण्याच्या पाण्यासाठी 354 टॅंकर राज्यात सुरू करण्याची वेळ आली आहे. यामध्ये 85 सरकारी, तर 269 खासगी टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी याच सुमारास राज्यात 98 टॅंकर सुरू करावे लागले होते.

राज्यात सर्वाधिक 198 टॅंकर हे मराठवाड्यात सुरू करावे लागले आहेत, मराठवाड्यातील तब्बल 175 गावं टॅंकरग्रस्त झाली आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक 160 टॅंकर 153 गावांमध्ये सुरू करावे लागले आहेत. नाशिकमध्ये 58, तर नगरमधील 52 गावांमध्ये टॅंकरने पाण्याचे वाटप सुरू झाले आहे. पुणे जिल्ह्यातदेखील टॅंकरची सुरवात 7 गावांमध्ये झाली आहे, तर साताऱ्यातही 15 गावांत 13 टॅंकर सुरू झाले आहेत. पावसाची नाराजी कायम ओढावून घेणाऱ्या विदर्भातील केवळ बुलडाणा जिल्ह्यात 9 टॅंकर सुरू झाले आहेत, तर कोकण विभागात मात्र एकही टॅंकर सुरू करण्याची वेळ अद्याप आलेली नाही.

जिल्हा....... टॅंकरची संख्या
नाशिक.... 53
धुळे........ 7
जळगाव.... 11
नगर....... 54
पुणे.......... 9
सातारा....... 13
औरंगाबाद... 160
जालना....... 35
बीड........... 1
बुलडाणा....... 9

Web Title: Water Supply by Tanker for 350 Village