यंदा टॅंकरची मागणी घटली

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 मे 2017

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याचा परिणाम

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याचा परिणाम
मुंबई - राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याचे टॅंकर धावू लागले आणि जनावरांसाठी चारा छावण्या दिसू लागल्या की दुष्काळाची चाहूल लागते. मात्र, गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने मे महिन्यातील टॅंकरची संख्या आणि खर्च 90 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे; तर चारा छावण्यांसाठी एकही अर्ज आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडे अद्याप आलेला नाही हे विशेष.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात 998 पाण्याचे टॅंकर देण्यात आले आहेत. एक हजार 34 गावे आणि दोन हजार 586 वाड्यांपर्यंत पाण्याचे टॅंकर जात आहेत.

पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की जूनमध्ये राज्यात सर्वत्र पाऊस पडला नाही, तर टॅंकरच्या संख्येत वाढ होते. मात्र, सध्यातरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत टॅंकरचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मागील वर्षी (2016) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार हजार 33 गावे आणि सहा हजार 548 गावांमध्ये पाच हजार 159 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर नसल्याने टॅंकरची मागणी होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आप्तकालीन व्यवस्थापन विभागाचा सर्वांत जास्त निधी टॅंकरवर खर्च होत असे. यंदा टॅंकरचे प्रमाण कमी झाल्याने त्यावर होणारा खर्चही कमी होणार आहे. 2016-2017 मध्ये आपत्कालीन पाणीपुरवठ्यासाठी 523 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यापैकी केवळ टॅंकरवर 309 कोटी 58 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यातील केवळ औरंगाबाद विभागात 226 कोटी रुपये खर्च केले गेले होते.

मराठवाड्यात यंदाही इतर विभागांच्या तुलनेत अधिक पाणीटंचाई दिसून येत असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येचे प्रमाण कमी झाले आहे.

औरंगाबादमध्ये या वर्षी 304 टॅंकर धावतायत; तर गेल्या वर्षी याचकाळात पाण्याचे 808 टॅंकर पळत होते. मराठवाड्यातील 345 गावे आणि 46 वाड्यांमध्ये 416 टॅंकर सुरू आहेत. गेल्या वर्षी मात्र दोन हजार 622 गावे आणि 951 वाड्यांमध्ये तीन हजार 516 टॅंकर सुरू होते. पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र साताऱ्यातील माण, खटाव आणि सांगलीतील जत, कवठेमहांकाळ, तासगाव या भागांत मोठ्या प्रमाणात टॅंकर सुरू आहेत.

चारा छावणीसाठी अद्याप अर्ज नाही
गेल्या वर्षीच्या पावसामुळे जसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला नाही; तसेच जमिनीत चांगला ओलावा असल्याने यंदा चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झालेला नाही. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून चारा छावण्यांची मागणी करणारे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत किंवा थेट मंत्रालयाच्या आप्तकालीन विभागात पोचत असतात. या वर्षी मात्र एकही अर्ज चारा छावणीच्या मागणीसाठी आलेला नाही. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये राज्यात 398 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या.

Web Title: water tanker demand decrease