
Shiv Sena : असल्या व्हिपला भीक घालत नाही; भास्कर जाधवांचा थेट निशाणा
मुंबईः आजपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. काल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी केला आहे. परंतु असल्या व्हिपला मी भीक घालत नाही, असं आक्रमक विधान ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेला व्हिप बजावण्यास आणि कारवाई करण्यास मनाई केलेली असतांना काल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि नाव दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परवा न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवत शिवसेनेला व्हिप बजावता येणार नाही, असं म्हणत पुढची सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे.
तरीही काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या ५५ आमदारांनी व्हिप बजावून अधिवेशनासाठी पूर्णवेळ उपस्थित राहण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार पलटवार केला.
काय म्हणाले भास्कर जाधव?
शेड्यूल १० या पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याचं सरकारला भान आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी हा कायदा आणला होता. बंडखोरांनी एखाद्या पक्षात सामील व्हावं किंवा नवीन पक्ष स्थापन करावा. व्हिपने कुणी घाबरवत असेल तर मी भीक घालत नाही. आमचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमचं संरक्षण काढलं तरी आम्ही डगमगलो नाही तर व्हिपचं काय घेऊन बसलात, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.