दुष्काळ पाहण्याची वेळ पुढच्या पिढीला येणार नाही: मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने शासन काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशन येथे जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावणीस फडणवीस यांनी आज भेट दिली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला, त्या वेळी ते बोलत होते. 

लासूर (जि. औरंगाबाद), ता. 8 ः मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने शासन काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशन येथे जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावणीस फडणवीस यांनी आज भेट दिली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला, त्या वेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, ""मराठवाड्यातील सर्व धरणे एकमेकांना जोडण्याचे नियोजन केले जात असून, मराठवाड्यातील मोठी अकरा धरणे एकमेकांना जोडली जाणार आहेत. इतकेच नाही तर मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून सर्वांना पाणी दिले जाणार आहे. प्रत्येकाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळात मराठवाडा सर्वांत जास्त होरपळला आहे. पाऊस कमी झाल्याने पिके कमी आली.

आधीच्या सरकारच्या काळात मार्चपर्यंत दुष्काळ जाहीर व्हायचा; मात्र, आम्ही ऑक्‍टोबरमध्येच दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना मदत दिली. याआधी केंद्रातून दुष्काळी मदत 700 कोटींच्या आसपास येत होती. मात्र, या वेळी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर केंद्राने 4,700 कोटी रुपयांचा मदत निधी दिला. त्यापैकी 700 कोटींची मदत अनुदान आणि पीक विम्याच्या स्वरूपात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली. पीक विम्यासंदर्भात बऱ्याच तक्रारी आल्या असून, त्या तक्रारींवर राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल.'' 

"जलयुक्त शिवार'सारख्या यशस्वी योजना राबविल्याने शेतीमालाचे नुकसान कमी झाले. या वर्षी पावसाळा थोडा उशिरा येणार असल्याने पेरणीची घाई करू नका, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. मराठवाड्याला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळावा, चांगला पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्‍त करत कापूस आणि सोयाबीनला चांगले भाव मिळाले तर ते आणखी चांगले होईल, अशी भावना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. 

ज्वारीची पेरणी वाढवा ः बागडे 
विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, ज्वारीची पेरणी वाढल्यास चाऱ्याची मुबलकता वाढेल. सोयाबीन, कापसासारख्या नगदी पिकांकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळल्याने ज्वारीचा पेरा अपेक्षित होत नाही. सरकारने ज्वारी खरेदी करून रेशन दुकानापर्यंत पोचविल्यास तिची मागणी वाढून शेतकरी पुन्हा एकदा ज्वारी पिकाकडे वळतील, तशी व्यवस्था शासनाने करावी. 

Web Title: we are working hard to uproot drought in marathwada says cm fadnavis