राज्यात एक हाती सत्ता आणू : मुख्यमंत्री

राज्यात एक हाती सत्ता आणू : मुख्यमंत्री

लातूर : राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती होईल की नाही याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेतील. पण केंद्र व राज्य शासनाने राबवलेल्या योजनांच्या बळावर व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा तर जिंकूच. पण विधानसभेत देखील एक हाती सत्ता आणू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यातील बूथ कार्यकर्त्यांच्या रविवारी (ता. ६) येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.

२०१४ च्या निवडणुकीत 'अब की बार, मोदी सरकार'चा संकल्प आपण पूर्ण केला आहे. २०१९ च्या निवडणुकीत 'फिर एक बार मोदी सरकार'चा संकल्प करण्यासाठी आपण सर्व सज्ज झालो आहोत. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी तर भाजप हा अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करीत आहे. भाजपसाठी २०१९ निवडणूक आव्हान आहे, असे काही म्हणत आहेत. पण या निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा मोठा विजय मिळणार आहे. येणारी निवडणूक ही सोशल मीडियाच्या भरवशावर मोठ्या प्रमाणात राहणार आहे. हे खरे असले तरी 'मॅन टू मॅन' आणि 'होम टू होम कॉन्टॅक्ट' ही भाजपची शक्ती आहे. आपल्या सरकारने राबवलेल्या योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत जरी पोहचलात तरी आपली सत्ता येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला दीड कोटी मतं मिळाली. यातून १२२ जागा जिंकल्या. आपल्याला येणाऱया निवडणुकीत दोन कोटी मतांची गरज आहे. आपण राबवलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी आहे. त्यांच्या परिवारातील इतर सदस्य असणार आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेसोबत युती होऊ अथवा न होऊ आपण योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोचलात तरी राज्यात एक हाती सत्ता मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे शस्त्र हे कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर चमत्कार घडतो. निवडणुका आल्या की तुम्ही वाऱ्यावर असता हे तुमच्या घरच्यांनाही माहीत आहे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत सर्वांनी काम केले तर 'फिर एक बार मोदी सरकार'चा संकल्प आपण पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com