Vidhan Sabha 2019 : अमित शहा म्हणतात, 'महाराष्ट्राला नंबर वन राज्य बनवू'

Vidhan Sabha 2019 : अमित शहा म्हणतात, 'महाराष्ट्राला नंबर वन राज्य बनवू'

नवापूर (जि. नंदुरबार) : कॉंग्रेसने सत्ता असताना महाराष्ट्राला निधी देताना सतत अन्याय केला. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने पाच वर्षांत कॉंग्रेसच्या चारपट निधी दिला. भाजप सरकारच्या कामांमुळेच केंद्र, राज्यात जनतेने संधी दिली. आता पुन्हा केंद्रात दिली. त्याचप्रमाणे राज्यातही पुन्हा एकदा भाजपची सत्ता "रिपिट' करा, महाराष्ट्र देशात एक नंबरचे राज्य बनवू, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. 

विधानसभेच्या नवापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारार्थ आज येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्‍याम जाजू, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री माणिकराव गावित, खासदार डॉ. हीना गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

शहा यांनी सुमारे 22 मिनिटांच्या भाषणात कॉंग्रेसची चुकीची धोरणे, कलम 370 रद्द करण्यास असलेला कॉंग्रेसचा विरोध याचा समाचार घेतला. भाजप सरकारनेच प्रथम मागास जनजातींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करून खऱ्या अर्थाने विकासाला प्राधान्य दिल्याचे सांगत काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करण्यास संपूर्ण देशाचे समर्थन मिळत असूनही कॉंग्रेस अप्रचार करीत आहे. कारण त्यांना देशाची नव्हे; तर मतपेढीची चिंता आहे. कॉंग्रेसने हे कलम पुन्हा लागू करण्याचे आश्‍वासन देऊन पाहावे, जनताच काय ते उत्तर त्यांना देईल, असे शहा म्हणाले. 

'आमचे ज्येष्ठ नेते' 

व्यासपीठावर असलेले माजी मंत्री, कॉंग्रेस काळात सलग नऊ वेळा खासदार राहिलेले माणिकराव गावित यांचा उल्लेख शहा यांनी "आमचे ज्येष्ठ नेते', असा करताच टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. येत्या 21 ऑक्‍टोबरला तुम्ही भरत गावित यांना मतदान करून इतिहास घडवा, असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com