महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात सातत्याने बदल

सचिन शिंदे
शनिवार, 7 एप्रिल 2018

कृषी सल्ला
गहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत आहे. गव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते. काढणी केलेले धान्य उन्हात चांगले वाळवावे. यंत्राने मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाईन हार्वेस्टरने केल्यास उपयुक्त ठरते.

कऱ्हाड : महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्रावर गेल्या दोन दिवसांत १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होता. आज आणि उद्या तो १००८ हेप्टापास्कल इतका राहील, असा अंदाज हवामानाचा अभ्यास करणारी आशय मेजरमेंटस् वेदर स्टडिजने वर्तविला आहे. 

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार  तो दाब कमीच असल्याने या दोन दिवसाच्या कालावधीतही मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ३ ते ७ मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अग्नेयकडून असल्याने वादळी वारे व पाऊस अशी स्थिती राहील. या शिवाय विजांच्या कडकडाटासह पाऊस होणे शक्‍य आहे. हा पाऊस पूर्वमोसमी पाऊस असल्याने दोन ते तीन तासांत पाऊस होऊन पुन्हा पावसात उघडीप अशी हवामान स्थिती राहणे शक्‍य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील.

कृषी सल्ला
गहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत आहे. गव्हाची काढणी शक्यतो सकाळी करावी. त्यामुळे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी राहते. काढणी केलेले धान्य उन्हात चांगले वाळवावे. यंत्राने मळणी करताना गव्हाचे दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कापणी, मळणी आणि धान्य पोत्यात भरण्याचे काम एकाचवेळी कम्बाईन हार्वेस्टरने केल्यास उपयुक्त ठरते.

उघड्यावर धान्य तसेच शेती उत्पादन असल्यास ते ताडपत्रीने झाकून घ्यावे. फुले बाजारपेठेत पाठवायची असल्यास तोडणी करून लवकरात लवकर पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावी. काढणीस आलेली फळे भाजीपाल्याची काढणी करून मालाची प्रतवारी करून बाजारात विक्रीसाठी पाठवावी. हळद व आले लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करावी.

Web Title: weather changes in Maharashtra