Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update maharashtra cold weather temperature down

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला

पुणे : राज्यात थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात १५ अंशांच्या खाली नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात घट होऊ लागली आहे. ही स्थिती पुढील तीन दिवस राज्यात अशीच कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यात गुरुवारी नीचांकी तापमानाची नोंद नगर येथे १२ अंश सेल्सिअस झाली. बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंशांनी घट झाली आहे. ही स्थिती पुढील तीन दिवस राहून त्यानंतर गारठा पुन्हा काहीसा कमी होण्याचे संकेत आहेत. राज्यात पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती कायम आहे. रात्री उशिरापासून गारठा वाढत आहे. तर दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका जाणवत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्यात २ ते ३ अंशांनी किमान तापमानात घट होऊ शकते.

शहर आणि परिसरात ही किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. गुरुवारी शहरात १२.९ तर लोहगाव येथे १४.९ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. शहरात पुढील तीन दिवस किमान तापमान १२ ते १३ अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना हुडहुडी जाणवण्याची शक्यता आहे.

पारा १५ अंशांच्या खाली

पुणे : १२.९, लोहगाव ः १४.९, जळगाव ः १४.५, नगर ः १२, महाबळेश्‍वर ः १२.८, नाशिक ः १३.९, सातारा ः १३.४, सोलापूर ः १४.७, औरंगाबाद ः १२.५, परभणी ः १४.१, नांदेड ः १४.८, अमरावती ः १३.८, गोंदिया ः १३.५, नागपूर ः १४.८, वरंधा ः १४.