esakal | Weather Update - राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; तीन दिवस ढगांच्या गडगडाटसह हजेरीची शक्यता

बोलून बातमी शोधा

RAIN

राज्यात पाच ते सहा दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.

Weather Update - राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; तीन दिवस ढगांच्या गडगडाटसह हजेरीची शक्यता
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट पडले आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा चटका कमी झाला आहे. येत्या आठवडाभर हा चटका कमी राहणार आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.

राज्यात ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा पारा खाली आला आहे. मात्र, काही भागात होत असलेल्या पावसामुळे सकाळपासून उकाडा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला पारा आता खाली आहे. सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथे २९.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव येथे ४१.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

हे वाचा - लॉकडाऊन अटळ; किमान १५ दिवसांच्या कडक निर्बंधांची शक्यता

येथे होणार अवकाळी पाऊस :
- सोमवार ः
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ
- मंगळवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ
- बुधवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ
- गुरुवार ः संपूर्ण विदर्भ

पुण्यात मंगळवार, बुधवारी पाऊस
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी रात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ०.८ अंश सेल्सिअसने कमी होऊन ३६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शहरात सोमवारी (ता. १२) दुपारनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. गेल्या आठवड्यात ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल.

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अवकाळी पावसाचे कारण काय?
बिहार आणि झारखंड परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. मध्य प्रदेशाच्या नैऋत्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच कोमोरिन परिसर आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ दरम्यान चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालचा उपसागर, श्रीलंका, दक्षिण तमिळनाडूची किनारपट्टी या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. त्यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. परिणामी पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत मेघगर्जना, वादळी वारा, विजांसह पाऊस पडणार आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.