
Rain Updates : अवकाळीने 'होरपळलेला' शेतकरी पुन्हा संकटात; दोन दिवस पावसाची शक्यता
राज्यात होळीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजूनही सावरतोच आहे. पण आता पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजपासून पुढचे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
१३ मार्च ते १५ मार्च या कालावधीमध्ये वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. १४ आणि १५ मार्चला पावसाची शक्यता अधिक आहे. तर नागपूरमध्ये १६ मार्च रोजी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अशा वातावरणामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तापमानात मोठी घट होऊ शकते. मात्र अवकाळी पाऊस सरल्यानंतर उकाडा मात्र अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्याची पावसाची तीव्रता पाहून हरभरा, गहू, मोहरी, जवस अशा पिकांचा कापणी, मळणी केलेला शेतमाल अधिक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.