राज्यात भारनियमन कमी होणार

महानिर्मितीसह अन्य कंपन्याकडून अतिरिक्त वीज
MSCB  Electricity
MSCB Electricitysakal

मुंबई : कोळसा टंचाई व उष्णतेच्या लाटेमुळे विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे महावितरणकडून राज्यात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती कंपन्यांनी कराराप्रमाणे वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने कंपन्यांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार शुक्रवारपासून (ता.२२) महानिर्मिती आणि अदानी या दोन्ही वीजनिर्मिती कंपन्यांनी महावितरणला अतिरिक्त वीज उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.

राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असल्याचे महावितरणने जाहीर केले. राज्यातील दोन कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी करते. वाढते तापमान आणि विजेच्या वापरात झालेली वाढ, यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईवगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात २४ हजार ५०० ते २५ हजार मेगावॉटपर्यंत विजेची मागणी नोंदवण्यात आली; परंतु वीजखरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई, तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत आहे. त्यामुळे महावितरणकडे सुमारे दोन हजार ३०० ते दोन हजार ५०० मेगावॉट विजेची तूट निर्माण झाल्याने राज्यातील काही भागांत भारनियमन करावे लागत आहे.

३,०११ मेगावॉट जादा वीज मिळणार

महावितरणला महानिर्मितीकडून साधारणत: ६ हजार ८०० मेगावॉट वीज मिळत होती, परंतु भारनियमनाचे संकट निर्माण झाल्याने महानिर्मिती आता ७ हजार ५०० मेगावॉटपर्यंत वीज देणार आहे; तर अदानी पॉवर कंपनीकडून काही दिवस एक हजार ७०० मेगावॉट वीज मिळत होती; मात्र शुक्रवारपासून दोन २ हजार २५० मेगावॉट वीजपुरवठा उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून तीन हजार ११ मेगावॉट जादा वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विजेच्या उपलब्धतेनुसार मागणी व पुरवठा यातील तूट कमी झाल्यास राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

विजेची उपलब्धता

महावितरणला आज रात्रीपासून अदानी पॉवर्सकडून ३०११ मेगावॉट वीज मिळणार असून महानिर्मितीलाही ७५०० मेगावॉट वीज उपलब्ध होईल. महावितरणला मिळालेल्या वाढीव ऊर्जेमुळे भारनियमन कमी होणार आहे आहे

भारव्यवस्थापनाचे प्रयत्न

  • अदानी पॉवर्सकडून

  • १३११ मेगावॉट वाढीव वीज

  • आधी १७०० मेगावॉट

  • आता ३०११ मेगावॉट

महानिर्मितीकडून

  • ७०० मेगावॉट वाढीव वीज

  • आधी ६८०० मेगावॉट

  • आता ७५०० मेगावॉट

राज्य ‘टाटां’कडून वीज खरेदी करणार

ऐन उन्हाळ्यामध्ये राज्यात विजेचा तुटवडा निर्माण झाला असतानाच अपुरा पुरवठा केल्याने अदानी आणि अन्य कंपन्यांना राज्य सरकारने नोटीस बजावली होती. राज्य सरकारच्या या कारवाईनंतर कंपन्यांनी नमती भूमिका घेत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील भारनियमन कमी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शुक्रवारी ‘टाटा’कडून सुमारे १८० मेगावॉट वीज खरेदीचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध व्हावा म्हणून राज्य सरकारने कंबर कसली आहे. मे महिन्यात भारनियमन नसेल आणि आजघडीला जिथे कुठे भारनियमन आहे; तेही कमी होण्याची शक्यता असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. आता खुल्या बाजारातून कोळसा आणि वीज खरेदी करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विरोधकांवर टीका

राज्यात कृत्रिम वीज टंचाई आणून हे सरकार भारनियमन करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राऊत यांनी त्याचाही समाचार घेतला. अशा आणीबाणीच्या काळात मतभेद बाजूला सारून एकत्र यायला हवे. मात्र, केवळ विरोधक म्हणून बोलत राहातात. या सरकारचे काम गेली अडीच वर्षे महाराष्ट्राला दिसत आहे असे राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com