पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर कंत्राटदारांचे "खड्डेभरण'

पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर कंत्राटदारांचे "खड्डेभरण'

मुंबई - आंतरराष्ट्रीय आणि आंतर्देशीय विमानतळ, मुख्य व्यापारी व प्रशासकीय केंद्रावरील वाहने, तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर 3,200 खड्डे पडले आहेत. ते भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) कंत्राटदारांची धावाधाव सुरू आहे. 

दहिसर चेक नाका ते माहीम जंक्‍शन असा 25.33 किलोमीटरचा हा महामार्ग मुंबईच्या प्रमुख रस्त्यांपैकी एक आहे. मुंबईला गुजरातसह उत्तर भारताशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावरून दिवसाकाठी अडीच लाख वाहने ये-जा करतात. पूर्व द्रुतगती महामार्गाच्या तुलनेत 75 टक्के जड वाहनांची वाहतूक पेलणाऱ्या या रस्त्याची यंदाच्या पावसाळ्यातही अत्यंत दुरवस्था झाली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत याची दक्षता बांधकाम विभाग घेतो. मात्र, वाहनांच्या प्रचंड ताणामुळे मुख्य रस्त्यावरील उड्डाणपुलाला जोडणारी ठिकाणे, सिग्नल यंत्रणा, तसेच जंक्‍शनवर खड्डे पडण्याचे प्रमाणही जास्त आहे. 

काही दिवसांपूर्वी पीडब्ल्यूडीच्या पथकाने केलेल्या पाहणीत या रस्त्यावर लहान-मोठे 3,200 खड्डे असल्याचे स्पष्ट झाले होते. यापैकी बहुसंख्य खड्डे पीडब्ल्यूडीने बुजवले. पण, भरलेला खड्डा पावसामुळे उखडतो आणि तेथे पुन्हा खड्डा पडतो. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात या मार्गावरील बुजवलेले 116 खड्डे उखडले होते. पाऊस थांबल्यानंतर हे खड्डे डांबरमिश्रित खडी व पेव्हर ब्लॉकने भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने या कामावर पाणी फेरले गेले. यंदा पावसाळ्यात या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी 22 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. 

विमानतळ रस्ता खड्डेविरहीत 

पीडब्ल्यूडीने वांद्रे ते विमानतळादरम्यानचा रस्ता खड्डेविरहित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 27 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. डेन्स बीटूमिन्स मॅकेडोम (डीबीएम) आणि अस्फाल्टिक कॉंक्रीटचा थर या रस्त्याला दिला जाणार आहे. विमानाची धावपट्टी करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. याशिवाय या संपूर्ण मार्गाच्या दुभाजकाचे सुशोभीकरण करण्यासाठी पावणेतीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

जानेवारीत रस्ता पालिकेकडे 

पश्‍चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी पीडब्ल्यूडीकडे आहे. मात्र, या कामासाठी आवश्‍यक असलेला निधी पीडब्ल्यूडीकडून कधीच मिळत नाही. त्यामुळे रस्त्याची देखभाल-दुरुस्ती ही केवळ नावापुरतीच असते. ती योग्य प्रकारे व्हावी, तसेच त्याला आवश्‍यक असलेला निधी वेळेत देता यावा यासाठी त्याची जबाबदारी महापालिकेकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी 2017 मध्ये हा रस्ता महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com