बॅंक घोटाळ्याशी शरद पवारांचा काय संबंध? - अण्णा

एकनाथ भालेकर
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

राळेगणसिद्धी ः ""मी दिलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव नाही, हे सत्य आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. खोटे आरोप करणे मला आवडत नाही,'' असे स्पष्टीकरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले.

राळेगणसिद्धी ः ""मी दिलेल्या पुराव्यांमध्ये शरद पवार यांचे नाव नाही, हे सत्य आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. खोटे आरोप करणे मला आवडत नाही,'' असे स्पष्टीकरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले.

राळेगणसिद्धी येथे आज पत्रकार परिषद घेऊन अण्णांनी हा खुलासा केला. राज्यातील शिखर बॅंक गैरव्यवहारप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तक्रार केली होती. या प्रकरणी "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्या 70 नेत्यांवर "ईडी'ने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अण्णांनी केलेला खुलासा महत्त्वपूर्ण मानला जातो.

या प्रकरणी हजारे म्हणाले, की माझ्याकडे आलेल्या पुराव्यानुसार शरद पवार यांचा या प्रकरणात कुठलाही संबंध नाही. मात्र, अजित पवार व इतरांची नावे या प्रकरणात आहेत. "ईडी'ने शरद पवार यांचे नाव कसे काय घेतले, हे मला माहिती नाही. नाव कसे आले, हे चौकशीच्या पुढील टप्प्यात सिद्ध होईल.

""सहकारी साखर कारखान्यांसाठी बॅंकेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले गेले. मात्र, त्यानंतर कारखान्यांनी बॅंकांना पैसे परत दिले नाही. त्यामुळे बॅंकांनी कारखान्यांवर जप्ती आणली. बॅंकांनी हे कारखाने कवडीमोलाने खासगी कंपन्यांना विकले. कारखाने आजारी पडले की पाडले गेले, या व्यवहारातच मला शंका आहे,'' असे असे अण्णा म्हणाले.

""सीआयडीचे अधिकारी जय जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी न करता दोन ओळींत, या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे मला या प्रकरणात अधिकाऱ्यांचेदेखील हात असल्याची शंका येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे त्यांच्याही चौकशीची मागणी करणार आहे,'' असे हजारे यांनी पत्रकारांना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is Sharad Pawar's connection with the bank scam? - Anna