
सत्तासंघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर काय घडेल? वाचा तज्ञ काय म्हणतात supreme court
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पुर्ण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर तब्बल ९ महिने सुनावणी सुरू होती. दरम्यान कोर्टाच्या निकालावर देशाचं लक्ष लागून आहे. मात्र या निकालावर कोणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही की निकाल कसा लागेल.
याबाबत कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी 'सकाळ'शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.
सुप्रिम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास. काय होईल या प्रश्नाचं उत्तर देताना बापट म्हणाले, जर सुप्रिम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं. तसेच त्यांच्याकडे १४४ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असेल तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री देखील होऊ शकतात.
मात्र सुप्रीम कोर्ट १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे पाठवू शकतात. आणि जर का कोर्टाने पक्षांतर बंदी कायदा लागू केला तर शिंदे गटात गेलेले सर्व आमदार अपात्र होतात. आणि कोर्टाचा हा निकाल विधानसभा अध्यक्षांना मान्य करावा लागतो. आणि तस जर झालं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर राहता येत नाही.
त्यानंतर सरकार कोसळतं, राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाते, आणि सहा महिन्यांच्या आत मध्यवर्ती निवडणुका लागू शकतात. अशी माहिती कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय लागतो हे पाहणं खुप महत्त्वाचं ठरणार आहे.