'राजकारणात राणे नसतील तर काय होईल'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 सप्टेंबर 2018

राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज अनेकांना आला असेल. त्यामुळे पुन्हा ती चूक होवू देवू नका तर येणाऱ्या काळात माझ्या समवेत रहा असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
 

सावंतवाडी- राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज अनेकांना आला असेल. त्यामुळे पुन्हा ती चूक होवू देवू नका तर येणाऱ्या काळात माझ्या समवेत रहा असे भावनिक आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.

चिपी येथे होणारे विमानतळ हे माझेच मुल आहे, मात्र त्याचे श्रेय मला मिळू नये यासाठी मंत्री दीपक केसरकर राजकारण करत आहेत. हे विमानतळ होण्यासाठी मी किती खास्ता खाल्ल्या हे माझे मला माहित आहे, त्यामुळे माझ्या अपत्याला मी कसा काय विरोध करु असाही प्रश्न यावेळी राणे यांनी केला.

तालुक्यातील पक्षसदस्य नोंदणीसाठी येथील रवींद्र मंगल कार्यालयात राणे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदीप कुडतरकर, प्रणिता पाताडे, विकास कुडाळकर, प्रमोद कामत, मोहिनी मडगावकर, संजू परब, गीता परब आदी उपस्थित होते.

यावेळी राणे म्हणाले की, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत हे दोघेही कमी पडले आहेत. त्यांना राज्यात कोण ओळखत नाही ही वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी तुम्ही त्यांना निवडून दिले मात्र जिल्हा विकासाच्या तुलनेत आणखी दहा ते बारा वर्षे मागे गेला आहे. आगामी काळात ही चूक पुन्हा व्हायला देऊ नका राज्याच्या राजकारणात राणे नसतील तर काय होईल याचा अंदाज तुम्हाला आला असेल त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील तिन्ही आमदार एक खासदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असावा यासाठी प्रयत्न करा. 

पुढे ते म्हणाले की, जिल्ह्यात मी आणलेले प्रकल्प केवळ गुंडाळण्याचे काम पालक मंत्री दीपक केसरकर करत आहेत. त्यात सी वर्ल्ड प्रकल्प, रेडी बंदर, आडाळी एमआयडीसी सारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करीत बसण्यापेक्षा येथील किती युवकांना रोजगार दिला याचे उत्तर केसरकर यांनी द्यावे. जिल्ह्यात विमान उतरवण्यासाठी मी खो घालत आहे अशी टीका केसरकर यांनी केली परंतु, मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना विमानतळाला जन्म घातला आहे. 

यावेळी, रवी मडगावकर, पंकज पेडणेकर, जावेद खतीब, दीलीप भालेकर, प्रमोद सावंत, अन्वर खान, परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, उत्तम पांढरे, तारक परब, दया परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवा कार्यकर्ते मनोज नाटेकर यांनी पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या रवी मडगावकर, एस बी पोलाजी, तात्या वेंगुर्लेकर नितीन आसयेकर यांचा राणेंच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संजू परबांना आमदारकीची अप्रत्यक्ष ऑफर
यावेळी राणे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीड लाख मतदार आहेत त्यातील एक लाख मतदार नोंदणी करा आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे ते माझ्याकडून मिळवा, असे सांगून तालुकाध्यक्ष परब यांना राणे यांनी अप्रत्यक्षरीत्या आमदारकीचे ऑफर दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What will happen if there is no Rane in politics