व्हॉट्सऍपचे बळी...

whatsapp fake message claimed five people in dhule
whatsapp fake message claimed five people in dhule

माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सऍपकडे पाहिले जाते. अन्न, वस्त्र-निवाऱयाबरोबरच व्हॉट्सऍप हे जीवनावश्यक होऊ पहात आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात खरोखरंच हे माध्यम प्रभावी आहे. परंतु, या माध्यमाचा उपयोगाबरबरोबरच दुरुपयोग होऊ लागला असून, याचाच फटका धुळे येथील पाच जणांच्या हत्येला कारणीभूत ठरला आहे...

पिंपळनेरपासून (ता. साक्री, जि. धुळे) 25 किलोमीटरवर नवापूर (जि. नंदुरबार) सीमेवर राईनपाडा गाव. तेथे रविवारी (ता. 1) आठवडे बाजार होता. त्या वेळी दुपारी बाराच्या सुमारास एसटी बस राईनपाड्यात दाखल झाली. बसमधून पाच व्यक्ती उतरल्या. त्यांच्या हातात बॅग व पिशव्या होत्या. ते साध्या वेशात असल्याने आपण भिक्षेकरी आहोत, या त्यांच्या म्हणण्यावर कुणीही विश्‍वास ठेवला नाही. मुले पळविणाऱ्या टोळीच्या संशयावरून ग्रामस्थांनी अत्यंत अमानुषपणे पाच जणांची दगडांनी ठेचून हत्या केली. सर्व मृत नाथपंथीय डवरी समाजातील. गावोगावी भिक्षा मागत फिरणाऱ्यांतील. सध्या त्यांचा तळ घटनास्थळाजवळील पिंपळनेर येथे होता. जिवाचा थरकाप उडविणारी ही घटना केवळ गैरसमजातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गैरसमजाबरोबरच व्हॉट्सऍपही तितकचे कारणीभूत आहे.

व्हॉट्सऍपवरून मुले पळविणाऱया टोळीबाबत मजकूर फिरत असतात. अनेकजण खातरजमा न करता तो मेसेज विविध ग्रुपवर फॉरवर्ड करतात. विविध प्रकारच्या मजकूरासोबत छायाचित्रेही जोडतात. खरं तर मजकूर आणि छायाचित्राचा काडीमात्र संबंध नसताना ते एकमेकांशी जोडले जातात अन् नको त्या अफवा पसरल्या जातात. महाराष्ट्रातील मुले पळविणाऱया टोळीच्या अफवेचे लोण देशभर फिरत आहे. चेन्नईत मेट्रो कामगारांना मुलं पळविणारी टोळी समजून आज बेदम मारहाण करण्यात आली.

भारत शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), दादाराव शंकर भोसले (रा. खावे, मंगळवेढा), भारत शंकर मालवे (रा. खावे, मंगळवेढा), अगनू इंगोले (रा. मानेवाडी, मंगळवेढा), राजू भोसले रा. गोंदवून (कर्नाटक) हे मृत नाथपंथीय डवरी समाजातील भीक्षा मागून कुटुंबाची गुजरान करत होते. खरं तर त्यांच्याकडे पोलिस परवानगी, आधारकार्ड व स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेतल्याची कागदपत्रे होती. परंतु, यावर कोणीही विश्वास न ठेवता त्यांना ठेचून मारण्यात आले. आपल्याबाबत असा काही प्रकार घडेल याची त्यांना कल्पनाही नसेल. पण... यामध्ये या पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. पुढे पोलिस तपास होईल अन् कारवाईसुद्धा होईल. पण प्रश्न आहे तो अफवेचा...

सोशल मिडीयावरून असा अपप्रचार कोण करतो अन् माहितीची खातरजमा न करता तो फॉरवर्ड करणारेसुद्धा तितकेच दोषी आहेत. धुळ्यामध्ये या पाच जणांची हत्या करण्यापूर्वी व्हॉट्सऍपवरून असे मेसेज फिरत होते किंवा नाही हा संशोधनाचा विषय. पण... या पाच जणांचा जीव घेण्याइतपत लोक क्रुर का होतात... याचा अर्थ काहीतरी व्हॉयरल झाले असणार अन् या अफवेमधूनच ही घटना घडली असणार, हे कोणी नाकारू शकत नाही.

अफवांमुळे गैरसमज....
राज्यसह देशभरात आतापर्यंत मुले पळवणारी टोळी समजून अनेक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. हे मेसेज वाचल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील सुशिक्षित मंडळींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे. शिवाय, काही शंका निर्माण झाल्यास पोलिसांची मदत घेता येते. पण हे कोणाचा जीव घेण्याच्या आगोदर...

सोशल मीडियावरील अफवांमुळे गैरसमज
राज्यात आतापर्यंत मुलं पळवणारी टोळी समजून अनेक मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अफवांमुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर मुलं पळवणारी टोळी आली असल्याचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. हे मेसेज वाचल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील सुशिक्षित मंडळींनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेण्याची गरज आहे.

राज्यभरात मारहाणीच्या घटना

  • औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चांदगाव भागात 8 जून रोजी चोर समजून सात जणांना बेद मारहाण करण्यात आली. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला होता.
  • औरंगाबादमध्येच 16 जून रोजी पडेगावमध्येही एकाचा अशाच प्रकारामध्ये मृत्यू झाला. ईद मागण्यासाठी आलेल्या दोन बहुरुप्यांना मारहाण करण्यात आली होती.
  • औरंगाबादमधील कमळापूरमध्ये महिला नव्या घराच्या शोधात असताना मुले पळवण्याच्या शोधातून जमावाकडून मारहाण करण्यात आली.
  • लातूरमध्ये औसा तालुक्यातील बोरफळामध्ये 29 जून रोजी नवरा-बायकोच्या भांडणाला मुले पळवण्याचं स्वरुप देऊन मारहाण करण्यात आली.
  • लातूर जिल्ह्यातील निलंग्यातील हलगरामध्ये रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. जमावाने रिक्षाही जाळली.
  • नंदुरबारमध्ये 29 जून रोजी भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. मुलगी तिच्याच घरात सापडल्याने प्रकरणावर पडदा पडला.
  • परभणीत 20 जून रोजी मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन दोन जणांना मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांना पोलिसांना देण्यात आले.

पोलिसांच्या वतीने जाहीर आवाहन
सोशल नेटवर्किंगवर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे. परंतु अशी कुठलीही टोळी नसून या केवळ अफवा आहेत, हे वारंवार सांगितल्यानंतरही निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. कसलीही खात्री न करता मारहाण केल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी संशयास्पद व्यक्ती दिसली तर तिच्याबद्दल जवळील पोलिस ठाण्याशी संपर्क करा. निष्पाप लोकांना मारहाण करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस करत आहोत. परंतु, एवढे असतानाही मारहाणीबरोबरच जीव घेण्यापर्यंतच्या घटना घडत आहेत. यामुळे पोलिसांनी असे मेसेज तयार करणाऱयांबरोबरच फॉरवर्ड करणाऱयांवर कारवाई केली तरंच कुठे तरी हे थांबेल अन्यथा आज पाच जणांना जीव गमवावा लागला... उद्या काय होईल ते सांगता येणार नाही...

सोशल मीडियावर फिरणारे मेसेज हे खरोखरच खरे असतात का? अफवांचे मेसेज तयार करणाऱयांवर अथवा फॉरवर्ड करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई करावी का? अथवा सोशल नेटवर्किंगचा वापर कसा करायला हवा... याबद्दल तुम्हाला काय वाटते... याबद्दल जरूर लिहा... आपल्या एका प्रतिक्रियेतून एकाचा जीव वाचला तरी खूप काही झाले...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com