मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमध्ये मद्यपी, मनोरुग्ण घुसतात तेव्हा...

When an alcoholic, psychotic enters the CM's roadshow ...
When an alcoholic, psychotic enters the CM's roadshow ...
नगर : व्हीव्हीआयपी अथवा व्हीआयपी अधिकारी, राजकीय नेता शहरात आल्यानंतर पोलिसांना चोख बंदोबस्त ठेवावा लागतो. मात्र, त्यासाठी बऱ्याच खटपटी-लटपटी कराव्या लागतात. पोर्टफोलिओत न बसणारी कामे न कुरकुरता करावी लागतात. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातही तेच अनुभवायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागत कार्यक्रमात काही मद्यपी घुसले. त्यांना हटवता हटवता पुरे वाट झाली. रोड शोच्या मध्ये थांबलेल्या मनोरुग्णास सांभाळताना पोलिसांची चांगलीच तारांबळ झाली. रस्त्यावरची मोकाट जनावरे हटविण्यासाठी तर काही कर्मचाऱ्यांची खास नेमणूक होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल नगर शहरात दाखल झाली. नागापूर एमआयडीसी ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत त्यांनी रथातून रोड शो केला. त्यांच्या स्वागतासाठी चौका-चौकांत स्टेज उभारले होते. अनेक ठिकाणी कमानी उभारल्या होत्या. सर्व कार्यकर्ते आनंदात होते. परंतु पोलिसांची नुसती धावपळ सुरू होती. रस्त्यातील गर्दी पांगविणे, वेडीवाकडी लावलेली वाहने बाजूला करणे अशी कामे पोलिसांना करावी लागतात. परंतु काल झालेल्या रोड शोमध्ये जरा वेगळेच चित्र पहावयास मिळाले.

एमआयडीसी नागापूर येथे स्वागत कमानीजवळ कार्यकर्त्यांच्या गर्दीत काही मद्यपी घुसले. त्यांनी सुरवातीला भाजपसमर्थनार्थ घोषणा दिल्या. नंतर अजब जयकार त्यांच्या तोंडून व्हायला लागला. पोलिसांनी त्यांना बाजूला नेऊन सोडले की थोड्या वेळाने पुन्हा ते गर्दीत घुसत. कारवाईचा दम भरल्यानंतरही ते जुमानत नव्हते. गळ्यात भाजपचे उपरणे, हातात झेंडा असल्याने पोलिसांनाही मर्यादा पडत. चौकात थांबलेल्या स्थानिक नेत्यांजवळ जाऊन त्यांची उगाचच लुडबूड सुरू होती. या प्रकाराने उपस्थितांची चांगलीच करमणूक होत होती. त्यांचा तमाशा वाढल्यावर मात्र पोलिसांनी त्यांना बाजूला नेले. ते पुन्हा स्वागतस्थळी येऊ नये, म्हणून दोन कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर पाळत ठेवावी लागली.
मुख्यमंत्र्यांची रथयात्रा तेथून सर्जेपुरा परिसरात आली. रामवाडीजवळ एक मनोरुग्ण मंत्र्यांचा ताफा आल्यावर रस्त्याच्या मध्यभागी उभी राहिली. कितीही इशारे केले, तरी ती व्यक्ती जागची हलेना. मग मात्र चार-दोन कर्मचारी त्या व्यक्तीकडे धावले आणि बाजूला केले. रथयात्रा पुढे जाईपर्यंत त्या व्यक्तीलाच बंदोबस्त द्यावा लागला.

कर्मचारी झाले गुराखी
लाल टाकी, सिव्हिल हॉस्पिटल, रामवाडी, सर्जेपुरा चौकापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे बैठक मारतात. मुख्यमंत्र्यांचा रोड शो होईपर्यंत महापालिकेने ती जनावरे हकलण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. ते बिचारे मुख्यमंत्र्यांचा ताफा जाईपर्यंत हातात काठी घेऊन तेथे उभे होते.

"तारां'पुढे झुकले मुख्यमंत्री...
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा रथ मुख्य शहरात बसणार नाही, अशी चर्चा गेल्या तीन दिवसांपासून नगर शहरात सुरू होती. परंतु तरीही ही यात्रा मुख्य पेठेतून नेण्यात आली. रस्त्यात रथाला लागणाऱ्या वीजवाहक तारा उचलण्यासाठी महावितरणचे सुमारे पाच ते सात आणि महापालिकेचे कर्मचारी हातात फायबर पाइप घेऊन तारा उचलत होते. रथाच्या वर वारंवार येणाऱ्या तारांमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना झुकावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com