जेव्हा मुख्यमंत्र्यांना मिळते एक ग्लास पाणी भेट!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले पाणी भेट.

- बॅनरही आले होते झळकाविण्यात.

नागपूर : महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने मंगळवारी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक ग्लास पाणी भेट, असे बॅनर झळकावून आंदोलन केले. पाणीटंचाई असताना गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी केला. 

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरावर कृत्रिम पाणीसंकट निर्माण झाल्याचा आरोप करीत नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी भुतेश्‍वरनगरात आंदोलन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांना एक ग्लास पाणी भेट, असे बॅनर झळकावून अभिनव पद्धतीने आंदोलन केले. शहरातील अनेक भागांत जलवाहिन्यांना गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

तसेच जलवाहिन्याचे जाळे नसलेल्या भागांत पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरमधूनही पाणी वाहत आहे. शहरातील पाणीटंचाई अधिकाऱ्यांमुळे निर्माण झाली आहे. लवकरच ही कृत्रिम पाणीटंचाई दूर झाली नाही तर जनतेने आज अहिंसक मार्गाने आंदोलन केले; परंतु भविष्यात प्रशासनाविरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन केले जाईल, असा इशारा बंटी शेळके यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When CM Devendra Fadnavis gets a glass of water as a gift