
दोन महिन्यांनंतर का होईना, पण त्यांनी त्या बूटचोराला अटक केलीच आणि ‘जियो मुंबई पोलिस’ अशी शाबासकी मिळविली.
मुंबई ः अवघी दुनिया ज्याच्या मुठीत असते त्या उद्योगपतीच्या सुरक्षा रक्षकाची पादत्राणे चोरीला जाणे ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांसाठी तशी नामुष्कीचीच बाब. पण तो कलंक धुवून काढण्यात मुंबई पोलिसांना सुयश आले. दोन महिन्यांनंतर का होईना, पण त्यांनी त्या बूटचोराला अटक केलीच आणि ‘जियो मुंबई पोलिस’ अशी शाबासकी मिळविली.
रवींद्र प्रताप सिंग (३८) हे त्या सुरक्षा रक्षकाचे नाव. एका बड्या उद्योगपतीच्या संरक्षणाचे काम तो करतो. त्याची पादत्राणेही त्या उद्योगपतीच्या दर्जास साजेशीच. तब्बल साडेबारा हजार रुपयांची. २३ सप्टेंबर रोजी तो ते नवीन बूट घालून सकाळी सकाळी बाबुलनाथ मंदिरात गेला होता. अर्ध्या तासाने बाहेर आला, तर बूटस्टँडवरून ते ब्रँडेड बूट गायब. या घटनेने तेव्हा मोठीच खळबळ माजली.
मंदिरातील एका महिला कर्मचाऱ्याचा एका बूटचोरावर संशय होता.
गेल्या सोमवारी, ११ तारखेला तो आरोपी बाबुलनाथ मंदिर परिसरात घुटमळत असताना त्या महिलेने त्याला पाहिले. तिने तत्काळ गावदेवी पोलिसांना कळविले. तेही तातडीने धावले. प्रकरणच तेवढे गंभीर होते. त्यांनी तातडीने त्या उद्योगपतीच्या सेवकाच्या बूटचोरास अटक केली. त्याचे नाव पंकज ईश्वर शरण रावत चौहान (वय ४४). या कामगिरीबाबत पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.