हताश बळिराजाची जित्राबं बाजारात! 

हताश बळिराजाची जित्राबं बाजारात! 

औरंगाबाद - ""जवापास्नं शेती करतो तवापास्नं असा दुस्काळ नोता. यंदा फारच आवघड झालंय बगा. पोटच्या लेकरापरमानं संभाळलेली जनावरं ईकायला आनताना फारच वाईट वाटतंय. पण काय करणार? चारा-पानीच नाय. त्यांना ठिऊन तरी काय खावू घालणार...?'' 

तीव्र दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याने अशी अगतिकता व्यक्त केली अन्‌ बैल बाजारात आलेले इतर शेतकरीही गहिवरून गेले. कारण सर्वांच्या व्यथा त्याच अन्‌ वेदनाही त्याच. इतक्‍या खस्ता खाऊन जगविलेली जनावरे बाजारात विक्रीसाठी आणताना त्यांची पावले जड झाली होती; पण दुष्काळाने त्यांचा नाईलाज केला होता...या वर्षी पावसाने पुन्हा पाठ फिरविल्याने मराठवाड्यासह राज्यात अनेक भागांत आतापासूनच दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. 

महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांतील जनवारांचा मोठा बाजार असलेलं फुलंब्री तालुक्‍यातील वडोद बाजार गाव. दुपारचं ऊन वाढत होत. चारापाण्याच्या टंचाईमुळे जनावरं बाजारात विकायला घेऊन आलेले शेतकरी हतबल होऊन बसले होते. एक लाखाची बैलजोडी बाजारातील दलाल 30 हजार रुपयांत मागून नडलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच नाडायचा प्रयत्न करत होते. "बैल इकायचं नव्हतं फक्‍त चारा नसल्यानं इकतोय. यंदा पाण्यानं पाठ दाखवली, काहीच पीक हाती आलं नाही. जे आलं त्यावर जनवाराचं धकलं, आता कुठुंन आणायचं? दोन वर्षांपासून सांभाळत असलेली ही जनावरं चाऱ्याविना खुटीवर मरतील. आता त्यांना इकण्याशिवाय पर्याय नाही,'' असे विरेगाव (ता. भोकरदन) येथील कौतिकराव दळवी चिंतातुर होऊन सांगत होते. मराठवाड्याच्या अनेक भागांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा अशाच होत्या. 

बाजारात...  
म्हैस - 65 हजारांपासून पुढे 
बैलजोडी - 30 हजारांपासून पुढे 
शेळी - दोन हजारांपासून पुढे 
गाय - 30 हजारांपासून पुढे 

मराठवाड्यातील स्थिती 
- वडोद (ता. फुलंब्री) येथे वर्षभर दर सोमवारी भरणारा जनावरांचा मराठवाड्यातील सर्वांत मोठा बाजार 
- महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातूहनही बैल, गाय, म्हेस, शेळ्या मेंढ्या विक्रीसाठी येतात 
- आज एक हजारांहून अधिक बैलजोड्या, दीडशे म्हशी, दोनशेवर गायी दाखल. 
- हिंगोली - हिंगोलीसह कामठा फाटा (ता. कळमनुरी), जवळा बाजार (ता. औंढा) व वसमत येथे जनावरांचे आठवडे बाजार 
- परभणी - परभणी, बोरी. (ता. जिंतूर), पालम, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा, पाथरी, ताडकळस (ता. पूर्णा) येथे आठवडे बाजार 
नांदेड - नायगाव (बाजार), जांब, लोहा, कंधार, किनवट, उमरी, मुदखेड, बिलोली, धर्माबाद, हदगाव येथे जनावरांचे आठवडे बाजार 
- बीड - नेकनूर (ता. बीड), हिरापूर (गेवराई); तसेच साळेगाव (ता. केज) येथे जनावरांचे मोठे बाजार. 
- लातूर - मुरूड (ता. लातूर) येथील बाजारात दुष्काळामुळे जनावरांची संख्या कमी, नळेगाव (ता. चाकूर) येथे संख्या वाढली. 
- जालना - भोकरदन तालुक्‍यातील राजूरसह शिपोरा, बदनापूर तालुक्‍यातील गेवराईसह ठिकठिकाणी मिळेल त्या भावात पशुधन विक्री सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com