
Hasan Mushrif News: दिल्लीला जावून तक्रार करणारा BJPचा 'तो' नेता कोण? मुश्रीफांनी इशाऱ्यातून सांगितलं नाव
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने छापे मारले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच आता यावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया आली आहे. (NCP MLA Hasan Mushrif news in Marathi)
हसन मुश्रीफ म्हणाले की, आपण किरीट सोमय्या यांच्या विरोधात बदनामीचे दीड कोटींचे दोन दावे कोल्हापूरच्या फौजदारी कोर्टात केले आहेत.
मी काळापैसा शेल कंपन्यांमार्फत कारखान्याकडे वळवल्याचा त्यांचा आरोप आहे. वास्तविक पाहता, मी कारखान्याचा संचालक नाही. तसेच रजिस्ट्रार ऑफ कंपनीनेच शेल कंपन्याविरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचं मुश्रीफ यांनी नमूद केलं.
शेतकऱ्यांचे पैसे घेऊनच कारखान्यांची उभारणी झाली आहे. हे सर्व पैसे कारखान्याचेच आहेत. चंद्रकांत गायकवाड माझे मित्र आहेत. त्यांच्याशी व्यावसायिक काहीही संबंध नाही. सत्ता त्यांची आहे, त्यांनी शोधावं, असंही ते म्हणाले.
तसेच ब्रिक्स कंपनीशी माझा काहीही संबंध नसल्याचं मुश्रीफ यांनी नमूद केलं. तर गडहिंग्लज कारखान्याचा लिलाव केला नाही.
शासनाच्या नियमाप्रमाणे हा कारखाना ब्रिक्सला चालवायला दिला होता. मात्र ही कंपनी दोन वर्षेआधीच तोटा झाल्यामुळे सोडून गेली. तिथं आता संचालक मंडळ निवडून आलं असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान ग्रामविकास विभागाने एक जीएसटीचं टेंडर काढलं होतं. मात्र तक्रार करण्यापूर्वीच ते टेंडर रद्द केलं होतं. जावयाचा टेंडरशी कुठलाही संबंध नाही.
जावयावर खोटे आरोप करण्यात येत आहे. लहान मुलं, महिलांना घरातील सदस्यांना त्रास देण्यात येत आहे. राजकारणासाठी हे करणं योग्य नाही, असंही मुश्रीफ म्हणाले. सरकार त्यांचं आहे. ग्रामविकास खातं त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनी चौकशी करावी, असं आव्हान मुश्रीफ यांनी दिलं.
कागलमधील एका भाजप नेत्याने दिल्लीत जावून माझ्यावर कारवाई कऱण्यासाठी प्रयत्न केले होते. चार दिवसांपूर्वीच भाजप नेत्यानं सांगितलं होतं की, कारवाई होणार आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं होतं.
याबाबत पत्रकाराने समरजीत घाटगेंचं नाव घेऊन भाजपचा तो नेता कोण असा प्रश्न मुश्रीफ यांना विचारला. त्यावर मुश्रीफ यांनी नाव न घेता, पत्रकारानेच ते नाव सांगितल्याचं म्हटलं. अर्थात त्यांचा रोख घाटगे यांच्याकडेच होता.
अर्थात मुश्रीफ यांनी आपल्या आधीच्या प्रतिक्रियेत दावा केलेले भाजपनेते समरजीत घाटगे असल्याचं स्पष्ट झालं.
हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?