
Ambadas Danve : प्रकाश सुर्वेंच्या मुलाने तो व्हिडीओ डिलीट का केला? चौकशी झालीच पाहिजे
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
दरम्यान शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून अधिवेशनातही खडाजंगी दिसून आली. एकीकडे शीतल म्हात्रे यांनी या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटावर आरोप केले आहेत. तर ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अधिवेशनात यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने तो व्हिडीओ डिलीट का केला? याची चौकशी झालीच पाहिजे असंही दानवे यांनी म्हंटलं आहे.
ते अधिवेशनात बोलताना म्हणाले की,'' एका आमदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. तर या प्रकरणात दोषी नसलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. हा व्हिडिओ मॉर्फ केला आहे की खरा आहे माहीत नाही परंतु आमदाराच्या मुलाच्या फेसबुक पेजवरून डिलिट का केला. हा व्हिडिओ डिलिट का झाला याचाही तपास झाला पाहिजे असंही दानवे यावेळी म्हणाले आहेत.
तर मलाही तो व्हिडिओ आला मीही तो १० जणांना फॉरवर्ड केला. हा व्हिडिओ 32 देशात पहिला गेला. हा व्हिडिओ यूटूबवर 30 लाख लोकांनी पहिला. पोलिस विनाकारण लोकांवर कारवाई करतात. शिवाय पोलिसांनी त्या मुलाच्या फेसबुक व्हिडिओचा तपास करावा. त्या व्हिडिओमधून समजेल हा व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे हे समजेल असंही अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे.
काय आहे व्हिडिओ व्हायरल प्रकरण?
गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.