
Raj Thackeray: 'ते' वक्तव्य भोवलं अन् राज नमले..कोर्टात मागावी लागली माफी, जाणून घ्या प्रकरण
Raj Thackeray: हिंदी भाषिकांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून प्रादेशिकद्वेश पसरवल्याबद्दल आणि धमकी दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी न्यायालयात लेखी माफी मागितली आहे. दिल्ली न्यायालयाने त्यांची माफी स्वीकारली आहे.
यानंतर त्यांच्यावरील खटला संपला आहे. जमशेदपूरमधील सोनारी येथील रहिवासी सुधीर कुमार पप्पू यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ही बाब 9 मार्च 2007 ची आहे. मुंबईत मनसेच्या स्थापनादिनानिमित्त राज ठाकरेंनी बिहारी आणि हिंदी भाषिक लोकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
सोनारी, जमशेदपूर येथील रहिवासी असलेले वकील सुधीर कुमार पप्पू यांनी 11 मार्च 2007 रोजी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 13 मार्च 2007 रोजी जमशेदपूर दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली, तेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही.
जमशेदपूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. सी अवस्थी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153, 153 बी आणि 504 अंतर्गत समन्स बजावले.
दिल्ली न्यायालयाने ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते:
मनसे प्रमुखांनी झारखंड हायकोर्टात आपल्या वकिलामार्फत अनेक याचिका दाखल केल्या, पण दिलासा न मिळाल्याने 30 सप्टेंबर 2011 रोजी त्यांनी हा खटला सुप्रीम कोर्ट, दिल्लीकडे वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाने हा खटला जमशेदपूर न्यायालयाकडून तीस हजारी न्यायालय, नवी दिल्ली येथे वर्ग केला. त्यावर, 16 डिसेंबर 2012 रोजी तीस हजारी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
या प्रकरणातील प्रदीर्घ लढाईनंतर अखेर राज ठाकरे यांनी वकिलामार्फत माफीनामा दाखल केला. ते म्हणाले की, माझ्या भाषणामुळे कोणत्याही समाजातील लोकांचं मन दुखावले असेल तर राज ठाकरे यांनी बिनशर्त माफी, खेद आणि दु:ख व्यक्त केले आहे.
राज ठाकरेंचा माफीनामा मान्य, प्रकरण संपले:
राज ठाकरे यांच्या माफीनाम्यावर तक्रारकर्त्याच्या वतीने वकील अनूप कुमार सिन्हा यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
ते म्हणाले की, उत्तर भारतीय, बिहारी आणि हिंदी भाषिकांवर केलेल्या अशोभनीय वक्तव्याबद्दल याचिकाकर्ते राज ठाकरे यांनी माननीय न्यायालयात माफी मागितल्यास हे प्रकरण आम्ही संपवू. यानंतर ठाकरे यांचा माफीनामा स्वीकारण्यात आला आणि हे प्रकरण संपले.