
Shivsena News: 'फेसबुक लाईव्हमधील तोच व्हिडीओ डिलीट का केला?' व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याचा सवाल
Sheetal Mhatre News: शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
तर शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. व्हायरल व्हिडीओनंतर शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटावर आरोप करत टीका केली आहे.
तसेच त्यांचा व्हिडीऑ मॉर्फ केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार केली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकट ठिकाणी गुन्हे दाखल केले त्यानंतर काही जणांना अटकही केली आहे.
अटक केलेल्या 5 व्यक्तींमध्ये ठाकरे गटातील साईनाथ दुर्गे यांचाही समावेश आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान, या अटकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं असून काही सवालही उपस्थित केले आहे.
'शीतल म्हात्रे म्हणतात माझ्या व्हिडीओशी छेडछाड केली, व्हिडिओ मॉर्फ केला जात आहे. त्याबाबत पोलिसांकडे गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
आमचा साईनाथ दुर्गे नावाचा कार्यकर्ता दोन दिवस बंगळुरूमध्ये बहिणीकडे गेला होता. त्याला विमानतळावरून अटक केली आहे. हे काय सुरू आहे', असा प्रश्न घोसाळकर यांनी उपस्थित केला आहे.
'शीतल म्हात्रेंचं म्हणणं इतकंच आहे की, त्या व्हिडीओशी छेडछाड झाली आहे आणि असं असेल तर पोलिसांनी ते तपासावं. राजू सुर्वेंच्या फेसबुकवरून त्या मिरवणुकीचं लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं. लाईव्हमध्ये तोच व्हिडीओ होता.
मग तो व्हिडीओ डिलीट का केला?', असा प्रश्नही विनोद घोसाळकर यांनी यावेळी केला आहे. यावेळी त्यांनी दहिसर पोलीस स्टेशनला शीतल म्हात्रेंविरोधात तक्रार दिल्याचीही माहिती दिली आहे.
काय आहे व्हिडिओ व्हायरल प्रकरण?
गोरेगाव इथे शनिवारी (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे सहभागी झाले होते.
या रॅलीमध्ये शीतल म्हात्रे या जीपमध्ये असताना त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे. बदनामी करण्यासाठी हा व्हिडीओ मॉर्फ करुन ठाकरे गट आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.